Sunday, November 27, 2016

‘अभिव्यक्ती' रक्षण लढ्याचा ‘फायनल कॉल'

ज्येष्ठ भाषा तज्ज्ञ, सामाजिक भाष्यकार डॉ. गणेश देवी यांच्या पुढाकाराने ‘सनातन’ संस्थेचे केंद्र असलेल्या मडगाव येथे १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान ‘दक्षिणायन’ अभिव्यक्ती परिषद भरली. परिषदेस उपस्थित असलेल्यांनी कठोर आत्मपरीक्षण तर केलेच; पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढ्यातला हा फायनल कॉल असल्याचेही सूचित केले...
............................................................


मडगाव हे गोव्यातील एक महत्त्वाचं शहर. पण समुद्र पर्यटनाचं महत्त्वाचं ठिकाण, एवढीच ओळख या शहरासाठी पुरेशी नसावी की काय, म्हणून या शहराचं नाव जोडलं गेलं, ते ‘सनातन’ या संस्थेसोबत. ‘सनातन’ संस्थेचा मोठा आश्रम या शहरात आहे, आणि आता या शहराला आणखी एक ओळख मिळणार आहे ती म्हणजे, दाटून आलेल्या अंधारातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘दक्षिणायन’ अभिव्यक्ती परिषदेची! ज्येष्ठ भाषा तज्ज्ञ आणि सामाजिक भाष्यकार डॉ. गणेश देवी यांच्या मते, २०१६ हे वर्ष भारतीय संस्कृती, साहित्य आणि अभिव्यक्ती रक्षणाच्या इतिहासातील ऐतिहासिक वर्ष ठरेल. भारतात अभिव्यक्तीवर होत असणाऱ्या हल्ल्याविरोधात रान पेटविणाऱ्यांचा हाच प्रातिनिधिक आवाज १८ ते २० नोव्हेंबर २०१६ दरम्यान मडगावच्या रवींद्र भवन आणि लोहिया मैदानातून घुमला.


जेव्हा दिवस लहान आणि रात्र मोठी झालेली असते, त्या वेळी सूर्याचे दक्षिणायन सुरू झालेलं असतं. दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येनंतर देशातील अभिव्यक्तीभोवती वाढत जाणारा गडद काळोख चिरून टाकण्याचं स्वप्न उराशी बाळगून गणेश देवी यांच्या नेतृत्वाखाली ‘दक्षिणायन’ची सुरुवात झाली.


प्रतिगामी, पुनरुज्जीवनवादी, सांप्रदायिक, धर्मांध आणि फॅसिस्ट शक्तींनी देशातील सामान्य नागरिक, कलाकार, साहित्यिक, अभ्यासक, विद्यार्थी, महिला या सर्वांच्या अभिव्यक्तीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करायला सुरुवात केली असताना, ही परिषद सर्वार्थाने महत्त्वाची ठरली. सामान्य नागरिकांपासून ते साहित्यिक, पत्रकार, विचारवंत, कलाकार, अभ्यासक असे एकूण १२ राज्यांतील तब्बल ९०० प्रतिनिधी अभिव्यक्तीच्या जतनासाठी काय पावले उचलता येतील, यासाठी एकत्र जमले होते. माध्यमं व सोशल मीडिया किंवा कट्ट्यावरच्या गप्पा या सर्वांमधून, ‘आणीबाणी आली आहे का? हा फॅसिझम आहे का? किंवा सरकारने हे असं करायला नको होतं?’ अशा प्रकारची चर्चा चालू आहे. या पार्श्वभूमीवर ही परिषद यासाठी महत्त्वाची ठरली, कारण आजूबाजूला दाटलेला काळोख हा प्रत्यक्षात आहे की नाही, या चर्चेच्या पुढंचं पाऊल या परिषदेत पडलं.


परिषदेची सुरुवात एका विशाल सभेने झाली. तत्पूर्वी रवींद्र भवन ते लोहिया मैदान अशी मूक रॅली काढण्यात आली होती. हे अनेकार्थाने प्रतीकात्मक होतं. कारण दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येचा संशय सनातन संस्थेच्या साधकांवर आहे. अशा वेळी मडगावमध्ये परिषद घेऊन तुमचा दहशतवाद आम्ही सहन करणार नाही, हा संदेश संबंधितांपर्यंत पोहोचवला गेला. वस्तुत: मडगावमध्ये भरणारी ही परिषद रद्द करण्यासाठी ‘सनातन’तर्फे आंदोलनही करण्यात आले होते. मात्र, लोहिया मैदानातील सभेमध्ये ‘सनातन’ संस्थेवर बंदी घालण्याची एकमुखी मागणी सर्वांनी केली. त्याचसोबत मडगावमधील कार्यकर्ते प्रशांत नाईक यांनी, ‘सनातन’ ही मडगावची ओळख होऊ न देण्यासाठी ‘सनातन’विरोधी चळवळ सुरू केल्याचं आवर्जून नमूद केलं. या वेळी विचारमंचावर हमीद दाभोलकर, मेधा पानसरे यांच्यासोबतच महाराष्ट्रातून ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, गुजरातमधून उत्तम परमार व स्वत: गणेश देवी उपस्थित होते.
भारतीय विचारवंत अपयशी ठरले आहेत का? इथपासून पुरुषसत्ताकता, राष्ट्रवाद आणि मानवता, जातीयवादाविरोधातील संघर्ष, विकास आणि पर्यावरण यांच्यातील संघर्ष, काश्मीरमधील परिस्थिती, माध्यम स्वातंत्र्य आणि लोकशाही, सेन्सॉरशिप, अंधश्रद्धा आणि विवेक हे विषय केंद्रस्थानी ठेवून चर्चा, रचना आणि संघर्षाची रूपरेषा या ठिकाणी आखण्यात आली.


संमेलनातील महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या साहित्यिकांना कलाकृतींचे प्रदर्शन करताना अनेक अडचणी आल्या, ज्यांना आपली कला प्रदर्शित करण्यासाठी न्यायालयापर्यंत लढाई द्यावी लागली, त्यांच्या कलाकृती या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आल्या. त्यात प्रामुख्याने आनंद पटवर्धन यांच्या ‘जय भीम कॉम्रेड’ या माहितीपटाचा आणि संभाजी भगत यांच्या ‘विद्रोही शाहिरी जलसा’चा समावेश होता. सोबतच पंजाबमधील ‘रंगकर्मी’ ग्रुपने सादर केलेल्या ‘वारीस’ या नाट्यकृतीनं इथं जमलेल्यांची लढाई ही पितृसत्ताकतेविरुद्धचीही असल्याचे स्पष्ट केले.


या परिषदेला मागील दोन वर्षांत देशात घडत असलेल्या घटनांची पार्श्वभूमी होतीच, त्यामुळे मागील वर्षात देशात निर्माण झालेला विद्यार्थ्यांचा राजकीय लढा ही अत्यंत आशादायी बाब आहे, असे मत सहभागी झालेल्या स्वाती जोशी यांनी व्यक्त केले. माध्यम व्यवस्था, सरकारी यंत्रणा व उद्योगपतींच्या दावणीला बांधली गेली असल्यानं, ही लढाई कठीण असल्याचं नमूद करतानाच ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि सागरिका घोष यांनी पर्यायी माध्यमव्यवस्थेची नितांत गरज असल्याचे सांगितले. पुरोगामी, विवेकवादी लोकांनी स्वत:ची माध्यमव्यवस्था तयार केल्याशिवाय सद्यपरिस्थितीला तोंड देणं अशक्य असल्याची जाणीवही त्यांनी करून दिली. राजदीप सरदेसाई यांनी प्रतिगामी शक्तींना इथली माध्यमं, पत्रकार नाही म्हणू शकत नाहीत, हे वास्तव मांडतानाच इथली माध्यमं, त्यात काम करणारे लोक देशाच्या पंतप्रधानांना, प्रतिगाम्यांना जेव्हा ‘नो’ म्हणतील, तेव्हा ही मंडळी ‘पॉवरलेस’ ठरतील अणि त्यासाठी ‘अल्टरनेटिव्ह मीडिया’ हेच एकमेव शस्त्र असेल, असे म्हटले.


गुजरातमधल्या दलितांच्या जमीन सुधारणा कार्यक्रमाला वाहून घेतलेल्या मार्टिन मकवान यांनी ‘हम मानवता के लिये लढ रहे है, फिर भी हम इतने कम क्यूँ है? हम बहुमत मै क्यूँ नही है?’ असा प्रश्न उपस्थित केला. ही सर्व मांडणी करताना मकवान यांनी गुजरातमधील दलितांची स्थिती, जगासमोर न आलेले फसवे गुजरात मॉडेल उघड करण्याचा प्रयत्नही केला. मकवान यांची मांडणी अतिशय उपयुक्त ठरली, कारण भारतीयांसमोर प्राबल्यानं फक्त औद्योगिकीकरणाचंच गुजरात मॉडेल समोर आणण्यात आलं. त्यामुळे परिषदेतील सर्वांना गुजरात मॉडेलची दुसरी बाजू म्हणजे दलित शोषण, अभिव्यक्तीची गळचेपी या बाबी समजून घेता आल्या. गुजरातमधील परिस्थिती प्रचंड टोकाची असली, तरी गुजरातमधील साहित्यिक विचारवंतांनी मात्र ‘हम गुजरात में लढते है, डरते नही. लढने की आग ही आपकी विरासत बसा सकती है’ सांगत हा संघर्ष अवघड असला तरी लढावा लागणार आहे, हा संदेश दिला. आज जे देश सहन करतोय, ते गुजरातमधील ही मंडळी मागील १५ वर्षांपासून सहन करत आपली मुळं जिवंत ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न करत असल्याचे, या परिषदेच्या निमित्ताने समोर आले.


ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी सदर परिस्थितीचे उपस्थितांना सैद्धांतिक आकलन करून दिले. भारतीय इतिहास हा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा असून सध्याचा काळ हा प्रतिक्रांतीवाद्यांचा आहे, पण याला न थांबणारी क्रांती हेच प्रत्युत्तर असेल, हे सांगत सदर लढ्यामध्ये आशावाद पेरण्याचं काम केलं. फक्त भाषणांमधूनच नाही तर कविता, नाट्य, माहितीपट यांच्या माध्यमातून सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करण्याचा प्रयत्न या प्रसंगी साहित्यिकांनी केला. किशोर कदम उर्फ कवी सौमित्र यांच्या ‘मोर्चा’ आणि ‘राष्ट्रगीत’, ज्ञानेश्वर वाकुडकरांची ‘देश आझाद करण्या कोण येथे भांडले’ आणि वसंत आबाजी डहाके यांच्या ‘प्रश्न’ या कवितांची नोंद अंधारातून तेजाकडे झेपावण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षाच्या कविता म्हणून नक्कीच इतिहासाला घ्यावी लागेल, असा सूर उपस्थितांत उमटला.
अमोल पालेकर, आनंद पटवर्धन आणि संभाजी भगत यांनी कलाकारांचे प्रतिनिधी म्हणून मांडलेल्या भूमिका महत्त्वाच्या ठरल्या. आपण सर्व पुरोगामी, विवेकवादी लोक कायदा आणि संविधानाला बांधील असल्यामुळं कलेची अभिव्यक्ती जपण्याची लढाई ही पूर्णपणे संविधानिक असल्याचं मत अमोल पालेकर यांनी व्यक्त केलं.


संभाजी भगत यांनी मात्र सर्व प्रस्थापित कलाकार, साहित्यिकांवर हल्ला चढवत, साहित्यिकांनी राज्यसंस्थेची दारं अनुदानासाठी ठोठावण्यापूर्वी प्रेक्षकांकडं, नागरिकांकडं जायला हवं, ते तुम्हाला कधीच निराश करणार नाहीत, हे नमूद करताना ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकाच्या निर्मिती दरम्यानचे अनुभव कथन केले. आनंद पटवर्धन यांना त्यांच्या प्रत्येक माहितीपटासाठी मोठ्या प्रमाणात राज्यसंस्थेशी संघर्ष उभारावा लागला आहे. मला आजही आठवतंय, दाभोलकरांच्या हत्येच्या दुसऱ्याच दिवशी पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामध्ये एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना आनंद पटवर्धन यांची ‘जयभीम कॉम्रेड’ ही फिल्म दाखविल्यामुळे आणि शितल साठेचा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे मारहाण सहन करावी लागली होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली होती. सोबतच पुण्यातील कायद्याचं शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयामध्ये आनंद पटवर्धन यांच्या ‘राम के नाम' या फिल्मचं प्रदर्शनही यापूर्वी रद्द झालं. हे अनुभव पटवर्धनांनी उपस्थितांसमोर मांडले. विचारमंथन घडवून आणले.


या परिषदेचा शेवट झाला, तो योगेंद्र यादव यांच्या मांडणीने. ‘लोकशाही चौरस्त्यावर ही मांडणी करताना योंगेंद्र यादव यांनी निवडणुकांच्या राजकारणापेक्षा, विचारांचं राजकारण करण्याची गरज व्यक्त केली. सोबत ‘भारत’ ही संकल्पना नव्यानं लोकांसमोर घेऊन जाण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

अनेक वेळा भारतातील पुरोगाम्यांवर Converting the Convert प्रकारचे काम चालू असल्याची टीका करण्यात येते. ती काही प्रमाणात योग्यही आहे. पण ‘दक्षिणायन’नं सद्यपरिस्थितीला भिडायचा नवा प्रयोग अवलंबला आहे. मडगावची परिषद ही फक्त पुरोगामी कुठं कमी पडले, का कमी पडले, पोकळी का भरू शकले नाहीत, यावर आत्मचिंतन करणारी नव्हती; तर ही रस्त्यावर उतरून विचारांची पालखी खांद्यावर घेऊन केलेली एक ठोस कृती होती. परिषदेला किती पुरोगामी होते, हे मोजण्यापेक्षा त्यांनी चालवलेला संघर्ष किती तीव्र आहे, याची दखल घेणे महत्त्वाचे आहे. सरतेशेवटी, अभिव्यक्तीच्या रक्षणासाठी आता रस्त्यावर उतरल्याशिवाय आणि सामान्य माणसांसमोर नव्यानं मांडणी केल्याशिवाय पर्याय नाही, हे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी एकत्र येऊन ठरविणं, ही कृतीच सध्याच्या परिस्थितीमध्ये महत्त्वाची ठरणार आहे. रस्त्यावरच्या लढाईशिवाय पर्याय नाही, याची जाणीव या परिषदेने सर्वांना दिली आहे.

जगाचा इतिहास सातत्यानं ‘इस्ट’ आणि ‘वेस्ट’च्या भोवतीच विणला गेला आहे. जागतिक पातळीवर नव्यानं उदयास येत असलेल्या धर्मांध, फॅसिस्ट शक्ती या ‘इस्ट’ आणि ‘वेस्ट’चा भाग नसून, त्या ‘नॉर्थ’ आहेत. कारण त्यांना वरचं स्थान प्राप्त करायचं आहे. परिषदेला जमलेल्या लोकांचा संघर्ष हा वर नमूद केलेल्या ‘नॉर्थवाल्यां’विरुद्ध असल्यामुळे आपण सर्व ‘साऊथ’ आहाेत, हे सांगत यादव यांनी परिषदेच्या शेवटी ‘दक्षिणायन’ला नवा अर्थ दिला. एका अर्थाने, अभिव्यक्ती रक्षणासाठी, धर्मांधता आणि फॅसिझमला विरोध करण्यासाठी मडगावमधील दक्षिणायन- अभिव्यक्ती परिषद ही कदाचित या सर्व लढ्यातील ‘फायनल कॉल' ठरावी.

(सदर लेख दै. दिव्यमराठी वर्तमानपत्राच्या रसिक पुरवणीत दिनांक २७ नोव्हेंबर २०१६ रोजी प्रकाशित झाला आहे.)

प्रकाशित लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-abhishek-bhosale-rasik-article-in-marathi-5468479-NOR.html

No comments:

Post a Comment