Friday, August 11, 2017

बदन पे घाव है, पर इरादे बुलंद है...

शब्बीरपूरमधील दलितांसाठी 5 मे चा दिवस एक नव्या संघर्षाला जन्म देणारा होता. उत्तर प्रदेशमधील सहारनपूर जिल्ह्यातील हे गाव. मे मध्ये हे नाव भारताच्या नकाशावर ठळकपणे उमटलं ते तिथं घ़डवून आणलेल्या दंगलीमुळं. शब्बीरपूरमधील 65 दलितांची घरं जाळून टाकण्यात आली. त्यांना मारहाण करण्यात आली. सहारणपूर म्हणजे उ. प्रदेशमधील दलित राजकारणाचा केंद्रबिंदू. बहुजन समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला. या भागातील 7 विधानसभा जागांपैकी 5 जागा बसपाच्या हक्काच्या. पण यावर्षी झालेल्या निवडणुकीमध्ये या भागातून एकही बसपाचा उमेदवार निवडून आला नाही. या मतदारसंघामध्ये बसपाचा पराभव याची चर्चा संपते की नाही तोच योगी आदित्यनाथ यांनी शपथविधी घेतल्यापासून या भागात दलितांवर निर्माण करण्यात येत असलेली दहशत, करण्यात आलेला हिंसाचार व दंगल हा इथल्या स्थानिक दलितांना आलेला अनुभव.

नुकताच औरंगाबाद आणि नाशिकमध्ये सहारणपूर हिंसाचारबदद्लचे कार्यक्रम झाले. अग्नी भास्कर बुद्ध नावाचा या हिंसाचारात बळी पडलेला नागरिक देशातील वेगवेगळ्या भागात जाऊन खंबीरपणे 5 मे ला सहारणपूरमध्ये नक्की काय झालं हे सांगतोय. अग्नी प्रकाश बुद्ध यांच्यासह त्यांच्या पत्नी, आ, वडील आणि मुलांना या दंगलीमध्ये जबर मारहाण करण्यात आली. या हिंसाचारात मोडलेला हात अजूनही प्लास्टरमध्ये आहे. त्यांच्या पत्नीवर तलवारीने 9 ते 10 घाव घालण्यात आले होते. 26 तारखेला नाशिकमध्ये कार्यक्रम झाल्यानंतर त्यांच्या हाताची तपासणी केली असता दोन गंभीर फ्रॅक्चर असल्याचं लक्षात आलं. पण दंगल झाल्यानंतर ज्या रूग्णालयात त्यांच्यावर उपचार झाले तिथं मात्र ही बाब ध्यानात आली नाही किंवा मुद्दामहून दुर्लक्ष करण्यात आलं.

अग्नी प्रकाश बुद्ध सांगतात,   20 एप्रिलला (आंबेडकर जयंतीच्या 6 दिवसानंतर) शब्बीरपूरपासून जवळच असणाऱ्या सडक दुधली गावात काही हिंदुत्व संघटनांनी आंबेडकर जयंती साजरी करायचा प्रयत्न केला. हातात भगवे झेंडे, आंबेडकरांचा फोटो आणि घोषणा देण्यात येत होत्या, जय श्री राम, देश मै रहना है तो मोदी कहना होगा, यूपी मै रहना है तो योगी कहना होगा. मंदीर वही बनायेंगे च्या घोषणा देण्यात येत होत्या. म्हणजे बाबासाहेबांच्या जयंतीचा उपयोग करून इथल्या दलित आणि मुस्लिमांमधील तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक केलेला हा प्रयत्न. त्यात ते अयशस्वी झाले. सहारणपूरमधील ही अशी काही गावं आहेत जिथं आजपर्यंत आंबेडकर जयंती कधीच साजरीच करण्यात आली नाही. सरकार कोणाचंही असो आजपर्यंत परवानगी मिळालीच नाही.  पण यावर्षी हिंदुत्वावादी संघटनांतर्फे दलित मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी हा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला.

एकीकडे पंतप्रधान आणि त्यांचे समाविचारी लोक आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेबांसमोर लोटांगण घालण्याचं नाटक करत होते, तर दुसरीकडं शब्बीरपूरमधील लोकांना त्याच बाबासाहेबांची मूर्ती स्थापन करण्यासाठी प्रशासनाशी संघर्ष करावा लागत होता. प्रशासानाच्या मते, त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांचा दबाब आहे. या सर्व अनुभवाबद्दल त्याच्या मनात असेलली चीड त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती.

अग्नीप्रकाश सांगत होते, हम लोग बाबासाहब का एक चबुतरा बना रहे है. जमीन हमारी है. कानून का कोई उल्लंघन नही है.  जिस बाबासाहब ने कलम की जोर पर पूरे भारतीयों के लिये जिने का अधिकार दिया. किसीसे भेदभाव नही किया. वो बाबासाहब न्याय के प्रतिक है. उस न्याय की मूर्ती लगाने के लिये हमने भूके रहकर पैसे कमाये, अच्छे कपडे न पहने. और आप उसे विरोध कर रहे है. हमसे आप चाहे वैसै नारे लगाना चाहते है. भाई विद्नान को  तो विद्नान ही कहा जायेगा. किसी मूर्ख को जबरदस्ती से थोडे ही विद्नाव बनाया जा सकता है. हम तो बाबासाहब को ही बाप कहेंगे. आप जबरदस्ती हमसे दूसरे को क्यू बाप कहने को बोल रहे हो.  आज मूर्ती की परमिशन नही दे रहे है. कल शादी के लिऐ और बच्चे पैदा करन के लिऐ भी इनसे परमिशन लेनी पडेगी ? हा प्रश्न मात्र ही लोकं कोणत्या परिस्थितीमधून जात असतील याची जाणीव करून देण्यासाठी पुरेसा आहे. 

5 मेचा दिवस त्यांच्या आयुष्यावर मोठा घाव घालेल असं कधीच अग्नि प्रकाश यांना वाटलं नव्हतं. गावात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कारण शब्बीरपूरपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिमलाना गावात राजपूत संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. त्याची परवानगी पण काढली होती. त्या ठिकाणी फुलन देवीचा मारेकरी शेर सिंग राणा याचा सत्कार करण्याचं नियोजन ही करण्यात आलं होतं. त्यानंतर परवानगी नसतानाही डीजे, ढोल, तलवारी आणि बंदुकीच्या फायरिंग करत एक रॅली आजूबाजूच्या पाच गावांमधून नेण्यात आली. त्यात शब्बीरपूरचाही समावेश होता. शब्बीरपूरमधीन रॅली निघून गेल्यानंतर त्याच्या पाठोपाठ आलेल्या जमावाने गावातील दलित वस्तीवर हल्ला केला. घरं जाळली. असलेल्यांना जबर मारहाण केली. पाच तास हा सर्व प्रकार चालू होता. पोलिस फक्त बघ्याची भूमिका घेत होती. वर पोलिसांनीच दलित वस्तीवर फायरिगं केली. कोणतीच प्रशासकीय यंत्रणा सात तासापर्यंत तिथं पोहचली नाही. संपूर्ण दलित वस्तीला स्मशान बनविण्यात आलं. म्हणजे हा सर्व हिंसाचार प्रशासनाच्या पाठिंब्याने आणि पूर्व नियोजीत होता असं अग्नि प्रकाश ठामपणे सांगतात.   

यातली सर्वात गंभीर बाब म्हणजे, गोरक्षेच्या नावाखाली माणसांच्या हत्या करणाऱ्या या मंडळींनी दलित वस्तीतील गायींवरही तलवारीने वार केले. म्हणजे दलितांची गाय यांच्या गोरक्षेच्या अजेंड्यात बसत नसावी.

सहारणपूरमध्ये जे घडलं ते अचानक नव्हतं. त्याचे प्रयत्न दररोज करण्यात येत होते. दररोज दहशत निर्माण करण्यात येत आहे. जिस दिन से योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बने है, तबसे इनके कार्यकर्ता हर रोज गाडी पै तलवार लेके घुमते दिख रहे है. गाडी पे बैठ कर कर तलवार रास्तों पर घसीट कर लेके जा रहै है. आखिर ये सरकार तलवार दिखाके हमे क्या संदेश देना चाहती है. किन्हे दिखाया जा रहा है की हमारे पास तलवार का बल है और इतनी तलवार लेके घुमने वालों पै एक भी धारा लगाई नाही जा रही है. हे वास्तव मांडण्यासाठी हा माणूस फिरतोय. यूपीमध्ये परिस्थिती किती बिकट बनत चालली आहे,  त्याची तीव्रता हा माणूस बोलत असताना जाणवत असतेच.
मुलाखतीच्या शेवटी अग्नि प्रकाश यांना विचारलं, आपको डर नही लगता है. आप इतना घूम रहे है, आपके घरवालों पे इतना बडा हमला हुआ है. त्यावर हा माणूस जोरात हसला आणि तो जे बोलला ते भारतातल्या सर्वांना बळ देणार ठरो.

हम बाबासाहब को मानते है. बाबासाहेब हमारे अंदर डर पैदा नही होने देते है. वे तो अकेले लढे थे. हम तो इतने लोग है.   उनकी हर बात का जवाब दिया जायेगा. हम कानून की मदत से अपनी लढाई जारी रखेंगे. हमने सम्मान के लिये, बच्चो को बचाने के लिये, आपने महापुरूषों के सम्मान के लिऐ हमने प्रतिकार की कोशिश की तो हम पे ही केस डाला.  2012 मै मुजफ्फरनगर का दंगा हुआ था. एक बार जानवर को मूं मै खून लग जाये तो उसे खून की आदत लग जाती है. वैसे ही शासक लोंगों के मूं मै खून लगा है. इसी लिऐ वो तलवार दिखा रहे है.  हमारे इरादे तोडना चाह रहे है. हमे भी पता है ये चलने वाला है.
पर भाई साहब,
हमारे बदन पे घाव है, पर इरादे अभी भी बुलंद है...

Saturday, April 1, 2017

कादंबरी ते अनुभव...


काल काही कामानिमित्त पुण्याजवळच्या लव्हाळे भागातील डोंगराळ भागात जाण्याची संधी मिळाली होती. सोबत सतत या भागात जाणं येणं करणारा मित्र होता. या भागातील सामाजिक, राजकीय आणि अर्थिक परिस्थितीची चांगली माहिती त्याला होती. रस्त्याच्या बाजूलाच डोंगर फोडून चालू असलेलं वॉटर पार्कचं चालू असलेलं काम दिसत होतं. अख्ख्या डोंगरांची वाट लागली आहे. पोखरलं गेलंय सगळं. डोंगराच्या वरच्या टोकावर पोहचल्यावर खाली दिसणारा पाण्याचा बंधारा दाखवत तो सांगू लागला.

ते बघ अभ्या,  डोंगराच्या त्या बाजूला अजून असाच एक बंधारा आहे. ही आजूबाजूची गावं आणि नदीला जाणारं पाणी हे बंधारे बांधून अडवण्यात आलंय. पलीकडं एक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कंपनीचा गोल्फ क्लब आहे. ते पाणी त्या गोल्फ क्लबच्या हिरवळीसाठी वापरण्यात येतंय. आणि कोणी काही बोलतही नाही राव.. कोणी बोललं की एका पाठोपाठ 10 – 12 चारचाकी येतात आणि त्यातून येणारी लोकं ठोकत्यात जो आवाज करेल त्याला. त्यामुळं कोणी काही बोलत नाही.
तो हे सांगत होता आणि मला मात्र या अनुभवानं तोरणमाळमध्ये नेऊन ठेवलं होतं. दिनानाथ मनोहरांची फत्ते तोरणमाळ नुकतीच वाचण्यात आली. भौगोलिक दृष्ट्या मी जिथं उभा होतो ते ठिकाण आणि तोरणमाळ 600 किलोमीटर वगैरे दूर असतील. पण बाजार केंद्रस्थानी ठेवणाऱ्या संस्कृतीने मात्र दोन्हीकडं सारखेच प्रश्न निर्माण केलेत. हे प्रश्न निर्माण होत असताना किंवा आपल्यासमोर आ वासून उभे असताना साहित्यात त्याचं प्रतिबिंब उमटत राहणं समाजाच्या मृत नसण्याचं लक्षण ठरावं. म्हणून फत्ते तोरणमाळ कादंबरी महत्त्वाची वाटतेय आणि त्या अनुषंगाने लिहिण्याचा हा प्रयत्न.  

आदिवासी भागात काम केल्यामुळं त्यांच्याशी निर्माण झालेली नाळ दिनानाथ भाऊंच्या लेखनात सातत्यानं प्रतिबिंबित होते. फत्ते तोरणमाळ देखील त्याच आदिवासी समाजाच्या अस्तित्व टिकविण्यासाठीच्या संघर्षावरची कादंबरी आहे. पण अस्तित्वावर घाला घालणारा शत्रू मात्र बदललाय. तो आता बहुराष्ट्रीय झालाय, तो शहरापुरता मर्यादित राहिला नाही. त्याचा चेहराही शत्रू म्हणून तुमच्या समोर स्पष्ट नाहीये, तो तुमच्यात वावरणाऱ्याच्याच वेशात तुम्हांला उद्धवस्त करू पाहतोय.  

एनजीओ नावाचं दुकान वीज पोहचण्याआधीच सर्व आदिवासी भागात पोहचलंय. चळवळी मोडीत काढणं, त्यांचा जन्म न होवू देणं ही कामं अतिशय निष्ठेनं एनजीओवाली मंडळी करत असतात. अशाच एक एनजीओ काम करणारा हरिश, चित्र काढण्यासाठी काकडपाड्याला आलेली सुचेता आणि मुंबईच्या कामगार चळवळीतील पण लेखन करण्यासाठी तोरणमाळला आलेला डिकी आणि स्थानिक श्रावण ही माझ्या दृष्टीने कादंबरीची महत्त्वाची पात्रं.

विकास करण्यासाठी स्वीकारलेल्या जागतिकीकरणानं आमची विकासाची व्याख्यात उचकटून टाकली. विकासाच्या व्याख्येपासूनच विकासाच्या संकल्पनेची गुंतागुंत निर्माण झालेली आहे. विकासासाठी सातत्यानं नख लावलं जातंय ते म्हणजे निसर्गाला, पर्यावरणाला, साधनसंपत्तीला, नैसर्गिक स्त्रोतांना त्यातल्या त्यात पाणी ही जास्त संवेदनशील बाब.
 तोरणमाळमधील धबधब्याने उमरी नाल्याचा उगम होतो. या उमरी नाल्यामुळं या भागातील आदिवासी तग धरून आहेत. पण ट्रांस अटलांटा या मल्टीनॅशनल कंपनीला तोरणमाळ पर्यटन ठिकाण म्हणून विकसित करायचंय. त्यासाठी उमरी नाला आडवायचा घाट घातला जातोय. त्याविरोधात उमरी नाला बचाव समितीनं रचलेला यशस्वी संघर्ष म्हणजे फत्ते तोरणमाळ... कथा सांगण्यापेक्षा किंवा विश्लेषण करण्यापेक्षा आजच्या काळात ही कादंबरी मला का महत्त्वाची वाटतेय, ते लिहिणं जास्त महत्त्वाचं आहे.

कादंबरीतील प्रत्येक पात्रं ही आजच्या काळाचे प्रतिनिधी आहेत. शहरी ग्रामीण अवकाशामध्ये वावरत असताना निर्माण झालेला क्रायसिस, मग तो चळवळीचा असो वा नातेसंबंधांचा, तो कादंबरीमध्ये सातत्याने उभा राहतो. चळवळ म्हटलं की आज परत त्याची एक स्टीरीओटाईपड् अशी व्याख्या मनात रूजलेली असताना कादंबरीत दाखविलेला संघर्ष हा ती प्रतिमा मोडण्यास मदत करणारा आहे. कादंबरीमध्ये उभारलेला संघर्ष ज्या भौगोलिक भूभागात जन्माला येतोय त्याला श्रमिक चळवळीची पार्श्वभूमी आहे. त्याचं प्रतिबिंब सातत्याने कादंबरीत उमटत राहतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सूचेता, डिकी ही माणसं चळवळीचा कणा असली तरी नेतृत्व मात्र त्यांच्या हातात ठेवत नाहीत आणि माझ्या दृष्टीकोनातून ही सर्वात महत्त्वाची बाब. श्रावण सारखं नवं स्थानिक नेतृत्व जन्माला घालणं ही बाब श्रमिकच्या प्रतिबिंबच..

आजच्या सर्व गुंतागुंतीच्या प्रश्नांवर आणि एन्ड ऑफ आयडॉलॉजी व एन्ड ऑफ मूव्हमेंटच्या काळात फत्ते तोरणमाळ नक्कीच महत्त्वाची कादंबरी आहे.

                                                                                                                                               
शेवटी कादंबरीत आडविल्या जाणाऱ्या नाल्यासाठी आदिवासी समाज एकवटतो संघर्ष निर्माण करतो. सरकारला माघार घ्यायला भाग पाडतो. पण काल मी जिथं गेलो होतो तिथं मात्र सूचेता, श्रावण जन्माला आले असतील ना... पण कोंब फूटत असतानाच ती छाटली गेली असतील का ? किंवा त्यांचा जन्म व्हावा अशी संवेदनशीलताचा शहरानं मारून टाकली असावी का ? फत्ते तोरणमाळच्या कादंबरीतील मांडलेला पर्यावरणावरील, त्यावर अवलंबून असलेल्यांच्या अस्तित्वावरचा हल्ला कधी काळी वास्तवात मी उभा होतो तिथं झाला होता, पण त्याची ना कोणी दखल घेतली ना त्याचं साहित्यात रुपांतर झालं. त्यामुळं फत्ते तोरणमाळ अशा किती तरी समोर न आलेल्या हल्ल्यांची आणि दाबल्या गेलेल्या चळवळींची प्रतिनिधी आहे.  

Sunday, January 8, 2017

मृत गुरं फाडण्याचं काम जातीअंताच्या दिशेनच

मृत गुरं मोकळी करणं, त्यांची कातडी काढण्याचं काम जातीअंताच्या आहे हे समजून ते काम करणारे सर्वोदयी कार्यकर्ते विजय दिवाण यांची अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र विशेषांकासाठी घेतलेली मुलाखत ब्लॉग स्वरूपात उपलब्ध करून देत आहे. 

कौटुंबिक पार्श्वभूमी, बालपण आणि जडणघडण

            आमच्या कुटूंबाला एक पार्श्वभूमी आहे. आमचे वडील, काका, मामा हे सर्व गांधींजींकडं होते. आपलं गाव, घर - दार सोडून ते गांधीजींकडं गेले होते. आम्ही मागील पिढ्यांपासून भटके आहोत. आमचं गाव नाही. काका मनोहर दिवाण पहिले भारतीय कृष्ठसेवक आहेत. त्यामुळं ते गांधीजींशी जोडले गेले. त्यानंतर काकांमुळे वडील व इतर लोक गांधीजींशी जोडले गेले. आमचे मामा दत्ता महा मोठे शिल्पकार होते. ते मुळचे मलकापूरचे. साबरमती आश्रमात जाण्यासाठी त्यांनी आपलं गाव सोडलं. ते परत कधी गावात परतले नाहीत. आमचे वडील, काका सेवाग्राम आश्रमात राहिले. वडिलांनी ‘गांधीजींच्या सानिध्यात’ नावाचं पुस्तक लिहिलं. ही आमच्या कुटूंबाची पार्श्वभूमी.
         पण या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळं मी सर्वोदयात आलेलो नाही. ही गोष्ट पहिल्यांदाच स्पष्ट करण्याची गरज आहे. मुळात मी मुंबईकर आहे. आमचे वडील खादी कमिशनमध्ये होते. स्वातंत्र्यापूर्वी ते गांधीजींचा चरका संघ होता,  स्वातंत्र्यानंतर नेहरूंनी खादी कमिशन सुरू केलं होतं.
          या ठिकाणी काही गोष्टी लक्षात घेण्याची गरज आहे. स्वातंत्र्यानंतर या देशात दोन प्रवाह होते. त्यातील एक होता, सत्तेद्वारे परिवर्तन आणि सेवा. त्याचं नेतृत्व आपोआप नेहरूंकडे आलेलं होतं. त्यांना ज्या मार्गाने सेवा आणि परिवर्तनाकडे जायचं होतं तो राजसत्तेचा प्रामाणिक मार्ग त्यांनी स्विकारला होता. यात बहुतांश कॉग्रेसची मंडळी होती. त्याची तुलना आजच्या कॉग्रेसची करू नका. आजच्या कॉग्रेसचा त्याच्याशी व त्या तत्वांशी काही संबंध नाही.
           दुसरा प्रवाह होता, सत्तेशिवाय सेवा आणि परिवर्तन घडविण्याचे विधायक कार्य करण्याचा. त्यांचं नेतृत्व होतं विनोबांकडं. त्यामुळं आमचे काका, मामा, वडील विनोबांच्या मार्गाने गेले. ते सत्तेच्या भानगडीत कधी पडले नाहीत. चरका संघ हे सर्व सेवा संघमध्ये विलिन झालेलं होतं. पण मग नव्याने स्थापन केलेलं खादी कमिशन चालणार कसं ? त्यासाठी खादीतले तज्ञ असायला हवेत. आमचे वडील खादीचे तज्ञ होते. मग आण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांनी केलेल्या आवाहनामुळे आमचे वडील खादी कमिशनमध्ये रूजू झाले. सुरूवातीच्या काळात ते लखनौला होते. त्यामुळं माझं बालपण लखनौमध्ये गेलं.
            1962 साली आम्ही मुंबईत आलो. 1982 पर्यंत गोरेगावमध्ये वास्तवास होतो. या सर्व काळात आणीबाणीची एक पार्श्वभूमी माझ्या भोवती तयार झाली होती. 1962 ते 1982 दरम्यानचं माझं मुंबईतील वास्तव हे इतर शिक्षण घेणाऱ्या मुलांसारखंच होतं. या काळात आजूबाजूला चालणाऱ्या चळवळींशी माझा थेट संबंध आला नव्हता. पण त्यामुळं चळवळीचं वातावरण आजूबाजूला नव्हतं असं नाही. माझी आई सामाजिक कामात असल्यामुळे मृणालताई आमच्या घरी यायच्या. पूर्वेचं महिला मंडळ मृणाल ताई चालवत होत्या, तर पश्चिमेचं महिला मंडळ आमच्या आई चालवायच्या. सत्येंद्र मोरे आमच्या घराजवळ वास्तव्यास होते, त्यांचं आमच्याकडं येणं जाणं असायचं.
                   मी स्वत:ला आणीबाणीच्या पार्श्वभूमीवरचा व्यक्ती मानतो. आणीबाणीच्या काळात गोरेगाव तर असंतोषाचं एक मोठं केंद्र होतं. आणीबाणीनंतर गोरेगावमधलं चळवळीचं वातावरण अधिकच प्रबळ झालं होतं. सर्वोदयामध्ये मी काही ठरवून सहभागी झालो नव्हतो. मला एक मासिक काढायचं होतं. हा माझा मुळ उद्देश होता. मला साहित्यामध्ये रस होता. त्यामुळं सामाजिक आणि साहित्यिक विषयांना वाहिलेलं मासिक काढायचं होतं. आमचा एक मित्र होता सुनिल वागळे, त्याचे रमाकांत पाटीलांशी संबंध होते. ते सर्वोदय साधना नावाचं मासिक काढत होते. मला वाटलं स्वत:चं मासिक काढण्यापूर्वी काही दिवस तरी दुसऱ्याच्या हाताखाली काम करायला हवं. कारण मला मासिक कसं काढायंच ? कसं चालवायचं ? याची माहिती नव्हती. म्हणून मी सर्वोदय साधनेत आलो. नंतर सर्वोदय साधनेचं सर्व काम मीच पहायला सुरू केल्यामुळं स्वता:चं मासिक काढण्याचा प्रश्न निर्माण झाला नाही. 

आणीबाणी, जयप्रकाश आणि विचार

                   आणीबाणीच्या काळात जयप्रकाशजींची चळवळ मला स्पष्टपणे कळत होती. त्यानंतर मी सर्वोदय साधनेत आलो होतो. सर्वोदयात फूट पडली होती. विनोबावाले आणि जेपीवाले असे दोन प्रवाह निर्माण झाले होते. मी विनोबा गटात आलो होते. मला रमाकांत पाटलांशी जोडून घ्यायचं होतं. पण एवढ्याच कारणानं मी विनोबांजच्या प्रवाहमध्ये आलो होतो असं नाही. मला जयप्रकाश यांचं आकर्षण कधीच वाटलं नाही. आजही वाटत नाही. त्यावेळी जे थोडं फार आकर्षण होतं, ते फक्त आणीबाणी हटविण्यापुरतं मर्यादित होतं. आज मला जी स्पष्टता आहे ती तेव्हा होती असं नाही. ज्यावेळी जनता पक्ष निघाला त्यावेळी माझ्या मनात विचार यायचा, ‘सत्ता चालविण्यात इंदिरा गांधी एवढ्या वाकबगार आहेत त्यात जयप्रकाशजी उतरत कशाला आहेत.’ कारण निवडणूक किंवा राजकारण आणि जयप्रकाशजी यांचा 1952 नंतर कधी संबंध नव्हता. राजकारण त्यांनी 1952 ला सोडलेलं आणि ते सर्वोदयाकडं वळले होते. मग परत कशाला त्यात पडत आहेत अशी माझी भावना होती. पण दुसरीकडं इंदिरा गांधी तर निवडणुकीच्या बाबतीत वाकबगार होत्या. मला आजही वाटतं, जयप्रकाशजींनी एका विशिष्ट टप्प्यावर थांबायला हवं होतं. इंदिराजींनी लोकशाही पद्धतीनं निवडणुका सुरू केल्या होत्या, त्यामुळं पुढचा निर्णय त्यांनी जनतेवर सोडायला हवा होता. शेवटी ते त्यात पडले.
                        माझे अनेक मित्र छात्र युवा संघर्ष वाहिनीमध्ये काम करत असायचे. मला वाटतं त्या लोकांना फक्त 1975 ते 78 या कालावधीतीलेच जयप्रकाशजी हवे होते. समग्र जयप्रकाश त्यातली कोणालाच पाहिजे नव्हता. मी स्वत: जयप्रकाशजींना आजही विचारवंत मानत नाही. त्यांना धोरण म्हणून स्विकारता येईल. विचारवंत म्हणून मी विनोबांनाच ठामपणे स्विकारतो. जयप्रकाशजींनी वेळोवेळी पावले उचलली, त्यासाठी ताकद लावली, समाजवाद सोडतानाही त्यांनी ‘मी समाजवाद का सोडतोय ?’  हे लिहिलं. ते पूर्वी कम्युनिस्ट होते. मग कॉग्रेसमध्ये आले, ‘समाजवाद का ?’ असं पुस्तकही लिहिलं. नंतर ‘सर्वोदयच का?’ असंही पुस्तक लिहिलं. अशी त्यांची एकूण वाटचाल आहे. पण ही वाटचाल प्रामाणिक आणि तत्वज्ञानाची बैठक असलेली होती. जयप्रकाशजींची पूर्ण क्रांती आणि लोहियांची सप्त क्रांती यात मला काही फरक दिसत नाही. त्यामुळं मला कधी जयप्रकाशजींचं आकर्षण वाटलं नाही. 

ग्रामदान आणि जमिनीची सुरक्षितता

                         त्यामुळं मी विनोबांच्या कामाशी जोडून घेतलं आणि ग्रामदानाच्या कामात राहिलो. ग्रामदान आणि भूदान या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. भूदान म्हणजे भूमीचं दान आणि ग्रामदान म्हणजे गावासाठी दान. ग्रामदानात व्यक्तीनं आपल्या जमिनीची मालकी गावाकडं द्यायची आणि व्यक्तीनं वहिवाटदार राहायचं. अशी 19 ग्रामदानं त्यावेळी झालेली होती. आता 20 वं ग्रामदान मोहन हिराबाईचं मेंढालेखा नुकतंच झालं. ग्रामदानमुळं जमिनी सुरक्षित राहिल्या. कारण जमिनी खरेदीच करता येत नाहीत. आज जसं अंबानी एकेकाला ‘कॉर्नर’ करून जमिनी विकत घेतो, तसं ग्रामदान झालेल्या गावात शक्य नाही. गावात जमिनीवर व्यक्तीची मालकी राहिलेली नाही. जमिन विकत घ्यायची असेल तर गावाकडं जायला लागतं. गाव म्हणजे फक्त व्यक्ती नाही तर संपूर्ण समाज आहे. त्यांची सर्वांची संमती मिळणं आणि मिळवणं अवघड आहे. त्यामुळं ग्रामदान झालेली वीसही गाव आज सुरक्षित आहेत.
                              विनोबांचं जन्म गाव गागोदे आहे तिथं ग्रामदान झालेलं आहे. गागोदे विनोबांचं गाव आहे ही गोष्ट बाजूला ठेवा पण त्या गावानं विनोबांच्या विचारांचं अनुकरण केलं हे मला महत्त्वाचं वाटतं. त्यामुळं माझं त्या गावात जाणं येणं असायचं. पुढं मी मुंबई सोडली आणि गागोद्यात येऊन रहायला लागलो. विनोबांच्या घराचा रजिस्टर ट्रस्ट करण्यात आला. त्याचे पहिले अध्यक्ष अच्चुतराव देशपांडे होते.
                          मी जेव्हा गागोद्यात आलो होतो, त्यावेळी ट्रस्टने निर्णय घेतला होता, ब्रह्मचारी कार्यकर्त्यांचा गागोद्यात आश्रम करायचा. त्यावेळी आम्ही 5 – 6 लोकं तिथं होतो. बाकीचे सर्व कार्यकर्ते नंतर तिथून निघून गेले. मी मात्र तिथंच थांबण्याचा निर्णय घेतला. तुम्हांला माहितीच असेल कोकणातल्या जमिनी कशा पडीक असतात. त्यानंतरचा काही काळ मी त्या जमिनी ऊर्जित करण्यासाठी घालविला. त्यावेळी फिरत असताना एकदा मला दोन तीन बैल रस्त्याच्या कडेला मेलेले दिसले. त्यापूर्वी मी आप्पासाहेब पटवर्धननांचे चरित्र वाचलं होतं. त्यात आप्पासाहेबांनी मृत जनावरं फाडण्याचं काम केल्याचं मी वाचलं होतं. ती मृत जनावरं पाहिल्यानंतर अशी जनावरं फाडण्याचं काम आपणही करायला हवं, असं वाटायला लागलं. मी शेतीच्या कामामध्ये व्यस्त असल्यानं तेवढ्या तीव्रतेनं ते वाटत नव्हतं पण हे जनावरं फाडण्याचं काम शिकायला हवं हा विचार मनात सातत्यानं येत होता.
                                  कुठल्यातरी एका कार्यक्रमात देवरूखचे सर्वोदयी रमाकांत आरत्या आले होते. त्यावेळी मला कळालं की ते देखील जनावरं फाडण्याचं काम करतात. मी विचार करतच होतो, मी त्यानं जनावरं फाडण्याचं काम शिकविण्याची विनंती केली. पुढं त्यांच्या देवरूख गावी जाऊन मी हे काम शिकलो. पण गुरं फाडणं ही काही कला नाही. या देशात हे काम आधीपासून लोक करतच होते. पण शिकल्याशिवाय येणारी ती गोष्टही नाही. हे शिक्षण काही दोन चार दिवसांचं नव्हतं. एखाद दुसरं गुर फाडताना तुम्ही पाहिलं की ते तुम्ही करू शकता.
                                 पण एक गोष्ट मला नमूद करण्याची गरज आहे, जनावरं फाडण्याचं काम करायला हवं ही भावना मनात येण्यासाठी देवनारचा कत्तलखानाही कारणीभूत होता. 1982 साली अच्चुतराव पटवर्धन यांनी संपूर्ण गोवंशहत्या बंदीसाठी सत्याग्रह सुरू केला होता. तो 24 तास चालायचा. सत्याग्रहाचा कॅम्पच तिथं निर्माण झाला होता. त्यामुळं अशा कामाची मुळं माझ्या मनात त्या सत्याग्रहावेळीच पडली होती. लोकांनी गोवंश हत्या बंदीच्या सत्याग्रहाकडं कसं पाहिलं ? हा वेगळा मुद्दा आहे, पण या संपूर्ण सत्याग्रहाचा सर्वोदयाला फायदा झाला असं मला आज वाटतं. दोन भागात फुटलेली सर्वोदय या सत्याग्रहामुळं एकत्र आली. त्यामुळं चळवळ म्हणून या सत्याग्रहाचा फायदा झाला. बाकीच्यांनी कितीही स्थूल अंगाने याचं विश्लेषन केलं तरी आम्हांला याचा फायदा झाला हे नाकारता येणार नाही. 

सर्वोदय आणि गुरांचं शवविच्छेदन

                         गुरं फाडण्याचं काम मुळात सर्वोदयानं सुरू केलं आहे. विनोबा नाळवाडीमध्ये दलित वस्तीत राहायला आले होता. पुणे करार झाल्यानंतर बरोबर एक महिन्यानं ते दलित वस्तीत रहायला जातात ही पार्श्वभूमी समजून घेण्याची गरज आहे. विनोबा उगाच दलित वस्तीत जात नाहीत. दलित वस्तीत गेल्यानंतर विनोबा दोन्ही बाजूंनी बहिष्कृत झाले होते. दलित वस्तीत गेल्यामुळं सवर्णांकडून ते बहिष्कृत झाले होते. तर दुसरी गोष्ट अशी की, ते दलित वस्तीत जाऊन भंगी काम करत होते. भंगी हे महारांच्या खाली येत होते. त्यामुळं महारांकडूनही ते नाकारले गेले. त्यांच्या कार्यकर्त्यांना पाणी भरण्यास मज्जाव करण्यात आला होता. विहिरींवर सर्वोदयी कार्यकर्त्यांना मारहाणही करण्यात आली होती. अशा स्थितीत विनोबा वावरत असताना, तिथं गोपाळराव वाळूंजकर नावाचे एक कार्यकर्ते विनोबांसोबत होते. त्यांनी पहिल्यांदा विचारांचं अधिष्ठान देऊन गुरं फाडण्याचं काम सुरू केलं. त्यानंतर हे काम दापोलीला बाबा फाटकांनी सुरू केलं.  मग आप्पासाहेब पटवर्धनांनी सुरू केलं.
                      आप्पासाहेबांबद्दलची एक घटऩा आठवतेय. आप्पासाहेब दापोली जवळच्या एका गावात वाचनालयाचं उद्घाटन करायला गेले होते. त्या दिवशी गावात एक म्हैस मेली. मग काय आप्पासाहेबांनी सकाळ - सकाळी ती म्हैस फाडली. त्यामुळं आप्पासाहेबांच्या हातानं होणारं वाचनालयाचं उद्धाटन रद्द करण्यात आलं आणि आप्पासाहेबांना गावकऱ्यांकडून डूक्कर संबोधण्यात आलं. असंच काम करणारे भास्कर रानडे होते, त्यांना तर त्यांचे घरचे लोक वरून पाणी वाढायचे. बाबा फाटकांना तर चांभार समजण्यात आलं. त्यामुळं हे काम करणं गंमत नव्हती, त्यासाठी या लोकांना प्रचंड किंमत मोजावी लागली. ती आपल्याला लक्षात येणार नाही.
                      3 ऑक्टोबर 1948 रोजी बाबा फाटकांनी साने गुरूजींना एक पत्र लिहिलं, त्यात त्यांनी एक महिन्यात 282 गुरं फाडल्याचं नमूद केलं आहे. म्हणजे दिवसाला सरासरी 9 ते 10 गुरं फाडण्याचं काम त्यांनी केलं असेल. म्हणजे रोज 14 ते 15 तास काम करायचं. म्हैस फाडणं हे शक्तीचं काम आहे. या सर्व लोकांनी स्वत:ला कामात झोकून दिलं होतं, महत्त्वाचं म्हणजे त्यांनी या कामाला विचारांची बैठक दिली होती.
या सर्वांमध्ये गांधीजींची जी मला प्रतिभा दिसते, ती म्हणजे, ‘चामडं हे तर हिंसेचं प्रतिक आहे, त्याला गांधीजींनी अहिंसक बनविलं.’ मेलेल्या गुराचं कातडं हे अहिंसक आहे. आपण जर अहिंसावादी असू तर आपल्या पायातील चप्पलासुद्धा अहिंसावादी असायला हव्यात. एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे ती म्हणजे गुरं फाडण्याचं जे काम आहे त्यामागं एक वैचारिकता आहे. गांधीजींनी नंतर हे नमूद केलंच होतं, ‘गोशाळेमुळे गोसेवा होते आणि चर्मालयामुळे गोरक्षण होईल.’
                   आज जे स्वत:ला गोरक्षक म्हणतात, त्यांचा मुळात वैचारिक गोंधळ झाला आहे. ही मंडळी गोशाळा चालवते. त्यानं गोरक्षण कसं होणार ?  तुम्ही जेव्हा मेलेल्या गुराचं कातडं काढता याचा अर्थ काय होतो ? तुम्ही मेलेल्या गुराचं कातडं काढलं नाही तर तुम्हांला जिवंत गुरं मारूनच कातडं काढावं लागेल. म्हणजे एका मेलेल्या गुराचं कातडं काढणं म्हणजे एक जिवंत गुर वाचविण्यासारखं आहे. म्हणून गांधीजी सतत म्हणत होते की, ‘गोशाळेच्या शेजारी चर्मालय उभे करा. त्याशिवाय गोरक्षण होणार नाही.’ त्यामुळं आजचे गोरक्षक हे चर्मालय न काढता गोरक्षेच्या नावाखाली गोसेवा करत आहेत.
                        आज जे लोक गोरक्षा करत आहेत त्यांना स्वत:लाच माहिती नाही की ही गोसेवा आहे. जर त्यांना ही गोसेवा आहे हे माहित असेल तरी ते गोसेवा किती करतात ? याबद्दलही माझ्या मनात प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळं असल्या झुंडशाहीनं गोरक्षण होणार नाही. 

फुले, गांधी, विनोबा आणि गोवंश हत्याबंदी कायद्याची आर्थिक कारणमीमांसा

                  १८८३ साली स्वत: महात्मा फुल्यांनी गोवंशहत्या बंदी कायद्याची मागणी केली होती. फुले म्हणतात, “कोवळ्या कच्च्या वासरासहित वाहतुकीचे खांदेकरी बैलास खाऊ लागल्यावरून शेतकऱ्यांजवळ कष्टासाठी उपयोगी पडणाऱ्या मजबूत बैलाचे बेणे कमी कमी होत गेले. पुढे शेतकऱ्याजवळ पहिल्यासारखे मनमुराद जनावरे शिल्लक नसल्यामुळे त्यांच्या बागायती वेळच्या वेळी पोटभर खत पाणी मिळेनासे झाले. बागायती जमिनीतील फूल कमी झाल्यामुळे हल्ली बागायतीचे पूर्वीप्रमाणे पीक होत नाही. कधी कधी बैल पुरते नसल्यामुळे कित्येकांच्या पेरणीचा वाप बरोबर न साधता आल्यामुळे पिकास धक्का बसतो. कायदा करून अंमल आणल्याशिवाय येथील शुद्ध शेतकऱ्याजवळ बैलाचा पुरवठा होऊन त्यांना आपल्या शेतीची मशागत भरपूर करता येणार नाही. व त्यांच्याजवळ शेत खताचा पुरवठा होवून शेतकऱ्यांचा व सरकारचा फायदा होणे नाही.”
                          1883 साली फुले कायदा झाला पाहिजे अशी मागणी करतात.  त्याच्याशिवाय शेती आणि शेतकरी वाचणार नाही. त्यानंतर बरोबर 100 वर्षांनी 1982 साली विनोबांनी संपूर्ण गोवंश हत्या बंदीसाठी देवनार कत्तल खान्यावर आंदोलन केले.
                        यासंदर्भात विनोबा म्हणतात, “गोसेवेची पारख आर्थिक निकषांवर केली गेली पाहिजे. आर्थिक निकषांवर जे सिद्ध होऊ शकत नाही, ते या जगात टिकू शकत नाही. जर आमची गोसेवा आर्थिक निकषांवर टिकू शकत नसेल तर त्याला चिटकून राहण्यात अर्थ नाही. त्याला सोडणेच योग्य राहिल. गाय मनुष्य समाजाच्या उपयोगी आहे आणि आर्थिकदृष्ट्या लाभदायक आहे, हे आम्ही सिद्ध करू शकलो तरच आमची गोसेवा टिकू शकेल.”
                   गोवंश हत्या बंदीकडं पाहण्याची ही विनोबांची वैज्ञानिक दृष्टी आहे. गायीच्या शरीरात तैत्तीस कोटी देव आहेत अशा अंगाने फुले, विनोबा, गांधी कधीच बोलत नाहीत. ते फक्त आर्थिक गोष्टींसाठीच बोलताना दिसत आहेत. शेवटी ती आर्थिक गोष्ट साधणार नसेल तर आपण कितीही प्रयत्न केले तर गायी वाचणार नाहीत. मुळात या सगळ्यांचा गायी व बैल वाचविण्याचा अट्टाहास कशासाठी आहे ? तर जो शुद्राती शुद्र शेतकरी आहे तो टिकला पाहिजे. शेती टिकली पाहिजे.
                      आता प्रश्न राहिला कायद्याचा ? कायद्याची पहिली मागणी फुल्यांनी केलेली आहे हे मी वाचून दाखविलंच. दुसरी मागणी विनोबांची आहे. गांधीजींनी कधीही कायद्याची मागणी केलेली नाही. उलट गांधीजी म्हणतात.‘मागणी मुस्लिम समाजाकडून यायला हवी. त्यांच्यातील एक जण जरी कायद्याला विरोध करत असला तर मी कायद्याची मागणी करणार नाही.’ अशी गांधीजींची स्पष्ट भूमिका होती. सेवाग्राम आश्रमात जेव्हा सरहद गांधी खान अब्दुल खान जफार खान यायचे तेव्हा गांधीजी आश्रमीय लोकांना त्यांच्यासाठीचा मांसाहारी आहाराचा डब्बा पोहचविण्यास सांगत असत. त्यामुळं मला असं वाटतं या सर्वात जीव दयेचा प्रश्न कुठे येतो. जीव दया ही जैनांची मागणी आहे. ती फुले, गांधी आणि विनोबा यांची मागणी नाही.
                   गांधी आणि विनोबा म्हणत होते की, ‘आर्थिक दृष्ट्या आपण हे सिद्ध करून दाखवू ना की गाय भाकड झाल्यानंतरही उपयोगी आहे.’ गुर भाकड झाल्यानंतर कसं उपयोगी आहे ? तर तिचं कातडं काढा. तिच्या मांसापासून चरबी तयार करा आणि हाडांचं खत करा किंवा कॅल्शियम म्हणून उपयोग करा. गांधी आणि विनोबांच्या मतानुसार, ‘हे केलं तर ती प्रॉफिटेबल आहेच.’ असंही या गुरांचं साधारण वीस वर्षाचं आयुष्य असतं. त्यातले फक्त दोन वर्षच कुठलंही गुर गोठ्यात उभं राहतं, फार काळ उभं राहत नाही. तेवढ्याही काळात ते गुर शेण देतच ना. आता जे प्रश्न गुंतागुंतीचे होतात, याचं कारण गायरान जमिनी गावात नाहीत. गायरान जमिंनीवर एकतर वस्ती झालेली आहे किंवा तिथं आता गवत उगवत नाही.

सर्वोदयाच्या मर्यादा आणि काही आक्षेप

                         मी स्वत: जाती व्यवस्था मोडण्याच्या बाजूनं उभा आहे. पण जातीव्यवस्था तुटणार कशी ? तर ती कनिष्ठ जातीतील लोकांची कामं वरिष्ठ जातीतील लोकांनी केल्यावरच तुटते. संपूर्ण एवढ्यामुळंच पूर्णपणे जातीव्यवस्था तुटेल असं मी म्हणणार नाही. पण त्यादृष्टीनं प्रयत्न सुरू होतील. या अनुषंगाने माझा सर्वोदयावर आक्षेप असा आहे, ‘गोरक्षण, ग्रामोद्योग, अस्पृश्यता निवारण व अहिंसा हे गांधीजी व विनोबांना मृत गुरांच्या शवविच्छेदनातून साधायचं होतं. पण त्याचबरोबर समाजानं दलितांना जी हीन कामं करावयास भाग पाडली, ती हीन समाजपयोगी कामं पश्चाताप बुद्धीनं सवर्णांनी स्वत: करावीत. या कामाद्वारे दलितांशी संबंध जोडून त्यांचे प्रश्न समजावून घ्यावेत व ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करून दलितांना आत्मनिर्भर करावं. त्यांचे सबलीकरण करावं. त्यांच्यात अन्यायविरूद्ध लढण्याची हिम्मत निर्माण करावी, असा हेतू गांधी विनोबांचा होता.’
                     कनिष्ठ जातीतील कामं वरिष्ठ जातीतील लोकांनी करायची हे कामं सर्वोदयानं सुरू केलं. नीराचं काम सर्वोदयनंच सुरू केलं. ते भांडारी किंवा कऱ्हाळ समाजाचं काम होतं. मृत गुरांच्या शवविच्छेदनाचं काम सुरू केलं. भंगी काम सुरू केलं.  कुंभार समाजाचं काम करणं सुरू केलं. तर ही सर्व जातीव्यवस्थेनं लादलेली जी काम होती, ती आपण सवर्णांनी करावीत, पण मग ही कामं कशासाठी करायची ? तर त्यानिमित्तानं आपण त्या समाजापर्यंत पोहचू. त्यांचं दु:ख समजून घेऊ आणि ते काम करत असताना आपण त्याचा अनुभव घेऊ. ही मुळ भूमिका होती. पण सर्वोदयानं याकडं गांभिर्यानं लक्ष दिलं नाही. कारण आम्ही कोष्ट्यांचं काम केलं. विणकाम केलं पण त्या कोष्ट्यांची संघटना बांधली का ? आम्ही चांभार काम शिकलो किंवा मृत गुरांचं शवविच्छेदन करायला शिकलो ? पण या समाजाचे प्रश्न आमच्या पटावर आले का ? आम्ही भंग्यांचं काम केलं आणि आजही करतो. आम्ही हा प्रश्न आमच्या पटावर घेतला का ? आम्ही सवर्ण आहोत आणि दलितांची कामं करत आहोत इथंपर्यंतच पोहचून आम्ही आमची पाठ थोपटत राहिलो आणि आत्मसंतुष्ट राहिलो. त्याचं कामं त्यांचे प्रश्न आणि त्यांचं संघटन आणि जीवनमान सुधारण्याच्या दृष्टीनं प्रयत्न या गोष्टी सर्वोदयाच्या पटावर आल्याच नाहीत. माझ्या दृष्टीनं सर्वोदयाचं हे सर्वात मोठं अपयश आहे. जेव्हा ही सगळी कामं करण्यास इतर कोणीही धजावत नव्हतं, तेव्हा सर्वोदयच फक्त हे काम करत होतं.
                         गिरण्या बंद झाल्यानंतर आमचा सर्वोदयाचा त्यात काय ‘रोल’ होता ? तो आमचा विषय होता. गिरण्या बंद पडल्यानंतर आम्ही त्या बेकारांना चरका द्यायला हवा होता ना. नाही तरी गिरण्या बंद झाल्या पाहिजेत अशीच आमची भूमिका होती आणि आहे. ‘सेंट्रलाईज’ काहीच असू नये. पण मग त्या काळात बेकार झालेल्या गिरणी कामगारांना चरखे का दिले नाहीत ? जे गिरणी कामगार होते, त्यातले बहुतांश कोण होते ? तर दलित होते. मग त्यात सर्वोदयाला स्कोप होता ना ? त्यात आम्ही शिरू शकलो नाही. कारण आम्ही गांधी विनोबांची भूमिका समजून घेतली नाही. खडस आणि अरूण ठाकूरांनी लिहिलेलं ‘नरक सफाईची गोष्ट’ सारखं पुस्तक आम्ही का लिहिलं नाही ?
                        चरखा देवून रोजगार मिळाला असता का ? तर तो वेगळा मुद्दा आहे. पण आम्ही हे न करता रोजगार कसा मिळाला ? गिरण्या बंद झाल्यानंतर पत्ते कुटत बसलेले तरूण आपण सर्वांनी पाहिलेत. घरातील भांडी कुंडी विकल्यानंतर झाले काय ? बिअर बारमध्ये पहिली सर्व्हिस कोण दिली ? तर गिरणी कामगारांच्या मुलींनी. डान्स बार निघाले त्यात कोणत्या मुली नाचल्या ? तिथंही गिरणी कामगारांच्याच मुली नाचल्या ना.
                    गिरण्या बंद पडणं ही लहान गोष्ट नव्हती. खाऊजा धोरणांचा पहिला त्सुनामी मुंबईला धडकलेला होता. त्यातून हे सर्व प्रश्न निर्माण झाले होते. दाऊद. अरूण गवळी, अश्विन नाईक ही कुणाची मुलं होती ?  त्यामुळं चरख्यानं किती रोजगार मिळाला असता हे सांगता येणार नाही पण त्यातून संधी निर्माण झाली असती. कोणीच काही दिलं नाही तर आम्ही किमान चरखा देवून दोन पैसे तर देवू शकलो असतो. हे सर्व प्रश्न एकमेकांना संबंधित आहेत. हे सर्वोदय करू शकलं नाही.
                      गिरण्या बंद झाल्यानंतर बिअर बार निघाले, डान्स बार निघाले आणि मुंबईचं जे काही व्हायचं होतं ते आजच्या स्तरापर्यंत येऊन पोहचलं आहे. पण याचं चित्रण हवं तेवढं झालं नाही. गिरण्या बंद पडणं ही काही छोटी गोष्ट नव्हती. मला आश्चर्य वाटतं, नारायण सुर्व्यांनी गिरण गावची प्रतिकं वापरून काव्य लिहिलं. त्यांच्या समोर गिरण्या बंद झाल्या. त्यानंतरच्या गिरण गावाचं चित्रण त्यांनी पुढं का केलं नाही ? थोडं फार काहीतरी आलं. नुकतच नीरा आढारकरनं लिहिलेलं एक पुस्तक आलंय. चक्र सारखा चित्रपट आला. जयंत पवारांचा कथा संग्रह आला. सुनिल शानबागचं नाटक आलं. पण मोठ्या प्रमाणात म्हणावं असं काही लिखाण, साहित्य आलं नाही.

आंबेडकर, दलित समाज आणि मृत जनावरांचं काम

                 आंबेडकरांनी जेव्हा 1927 साली दलितांना मृत जनावरं ओढण्याचं कामं दलितांना सोडायला सांगितलं. त्यावेळी भालाकर भोपटकरांनी आंबेडकरांना प्रश्न विचारला होता. आंबेडकरांनी त्यासंदर्भात लिहिलं आहे, पण त्यांनी केसरीकार असा उल्लेख केला आहे. तो संदर्भ मी संपादित केलेल्या पुस्तकात टाकला आहे.
               आंबेडकर लिहितात, ‘एकदा मी संगमनेरला गेलो होते, त्यावेळी माझ्याकडं एक चिठ्ठी केसरीच्या बातमीदारानं पाठविली.
                त्यात लिहिलं होतं, तुम्ही तुमच्या लोकांना मेलेली ढोरं ओढू नका म्हणून सांगता. पण त्यांची हलाखी किती आहे ? त्यांच्या बायकांना चोळी लुगडं नाही. त्यांना अन्न नाही, त्यांना शेतीबाडी नाही, अशी अत्यंत बिकट परिस्थिती असताना दरवर्षी त्यांना मिळणारं कातड्याचं, शिंगाचं. मांसाचं 500 रूपये उत्पन्न फेकून द्या म्हणून सांगता त्यात तुमच्या लोकांचा तोटा नाही का ?
            मी (आंबेडकर) म्हणाले, तुम्हांला याचे उत्तर कुठं देवू ? इथं पडवीत देवू की सभेत देवू. लोकांच्या समोर सवालपट्टी झालेली बरी. मी त्या गृहस्थांना विचारलं तुम्हांला मुलं – माणसं किती ? त्यांनी सांगितलं, मला पाच मुलं आहेत, भावाची पाच – सात मुलं आहेत. मी म्हणालो (आंबेडकर), तुमचं कुटूंब मोठं आहे. तेव्हा तुम्ही व तुमच्या नातेवाईकांनी गावातील मेलेली सर्व ढोरं ओढावीत आणि पाचशे रूपयाचं उत्पन्न घ्यावं. शिवाय मी स्वत: तुम्हांला पाचशे रूपये वर देण्याची व्यवस्था करतो. माझ्या लोकांचं काय होईल, त्यांना अन्न वस्त्र मिळेल की नाही हे माझे मी पाहिन. मग एवढी फायद्याची गोष्ट तुम्ही का सोडून देता. तुम्ही का हे गुरं ओढण्याचं काम करत नाहीत. म्हणजे आम्ही काम केलं तरच फायदा आणि तुम्ही काम केलं तर फायदा नाही. असं आहे का ? खरं म्हणजे मनुष्य मात्र इज्जत प्यारी असते. लाभ प्यारा नसतो.”
                        त्यामुळं मला असं वाटतं, सर्वोदयी लोकांनी बाबासाहेब आणि फुले वाचलाच नाही. ही सर्वोदयींची फार मोठी उणीव राहिली. तीन हजार वर्षापूर्वीचे वेद वाचले पण समकालीन दलित काय म्हणत आहेत, ते फारसं या लोकांनी वाचलं नाही. त्यामुळं ही उणीव कायम राहिली. 

आहार स्वातंत्र्य आणि जातीव्यवस्था

                       ज्यादिवशी गोवंश हत्या बंदीचा कायदा झाला त्या दिवशी काही लोकांनी प्लेटमध्ये गोमांस घेऊन हा आहार स्वातंत्र्याचा मुद्दा आहे म्हणून ऱॅली काढल्याचे फोटो पाहिले. मी स्वत: आहार स्वातंत्र्याच्या बाजूनं आहे. पण मला त्या आहार स्वातंत्र्यवाल्या लोकानां एक प्रश्न विचारायचा आहे ? खाटिक आणि कोळी समाज कायम ठेवून, त्यांच्याशी रोटी बेटी व्यवहार न करता, आहार स्वातंत्र्यातून समता कशी निर्माण होणार आहे ? त्यांनी हे जरा समजावून सांगण्याची गरज आहे. तुमच्या आहार स्वातंत्र्यासाठी खाटिक समाज कायम ठेवायचा. त्याच्याशी तुम्ही बेटी व्यवहार करणार नाहीत. म्हणजे जातीव्यवस्थाच कायम ठेवणं आहे की नाही ? म्हणजे हे चुकीचं आहार स्वातंत्र्य आहे. कारण स्वातंत्र्यातून समताच निर्माण झाली पाहिजे. ज्या स्वातंत्र्यातून समताच निर्माण होत नसेल ते स्वातंत्र्यच खोटं आहे. त्यामुळं आहार स्वातंत्र्याची गोष्ट खोटी आहे. कोणाच्या जीवावर आहार स्वातंत्र्य मिळवणार तुम्ही ? म्हणजे तुम्हांला गायीचं मांस मिळालं पाहिजे हे मंजूर करून देखील तुम्ही हे काम का करत नाही ? तेवढ्यावरच थांबू नका तर त्यांच्याशी बेटी व्यवहारही करा. त्यामुळं मला वाटतं जसं आपण प्रत्येक गोष्टीकडं जातीव्यवस्थेच्या अंगानं पाहतो तसं या आहार स्वातंत्र्याच्या मुद्दाकडं देखील त्याच अंगानं पहायला हवं.

                            मी स्वत: फाशीचा विरोधक आहे. फाशी ही अमानवीय गोष्ट आहे आणि त्याचं कुठलंही मानवीय समर्थन करता येणं शक्य नाही. आता मी जे सांगतोय त्यातील आडनावं लक्षात घ्या. न्यायमुर्ती धर्माधिकारी यांनी अभ्यंकर खून खटल्यातील लोकांना फाशी सुनावली. मी त्यांना अनेक अंगांनी म्हटलं, तुम्ही अहिंसावादी आहात तरी फाशी दिली. ते म्हणाले, मला न्यायव्यवस्थेनं दिलेल्या चौकटीतच काम करावं लागतं. त्यांना मी म्हणालो, त्या रात्री तुम्हांला शांत झोप लागली का ? तर ते म्हणाले, विजय, मला झोप कशी लागेल ? मला या प्रकरणात काळात डायबिटिस झाला. मी त्यांना पुढं काही बोललो नाही. पण माझ्या मनात विचार येऊन गेला, फाशी हा शब्द फक्त लिहिल्यानं तुम्हांला डायबिटिस होतो. तर जो माणूस फाशीचा फांदा बांधतो, ओढतो त्याला काय होत असेल ?
                       ज्यादिवशी फाशीची शिक्षा झाली तो दिवस मला चांगला आठवतो. अभ्यंकराचा फाशीची शिक्षा दिली जाते. धर्माधिकाऱ्यांनी ती सुनावलेली असते. नानासाहेब गोरे म्हणतात, फाशी लगेच दिली गेली पाहिजे. मग फंदा कोणी ओढायचा ? तर तो मांगानं ओढायचा.
                    फाशीची शिक्षा व त्या चर्चेत जातीचा मुद्दा चर्चिला जात नाही. फाशीची शिक्षा कायम ठेवायची म्हणजे जातीव्यवस्था कायम ठेवायची. त्यामुळं फाशी आणि मांसाहार कायम ठेवताना तुम्हांला जात व्यवस्था कायम ठेवावी लागणार. मग या लोकांना हे मंजूर आहे का ? त्यामुळं सध्या अस्तित्वात असलेली आहार स्वातंत्र्याची कल्पना मला मान्य नाही. तुम्हांला गाय खायची आहे ना मग तुम्ही स्वत: ती कापा. तुमच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी कोणीतरी हे काम जातीव्यवस्था कायम ठेवून करायचं ही पद्धतच मुळात अमानवीय आहे. एक तर स्वत: गायी कापायच्या नाहीत आणि खाटिकासोबत रोटी – बेटी व्यवहार करायचा नाही. हे दोन्ही करायचं नसेल तर मग आम्ही आहार स्वातंत्र्यापेक्षा गोवंश हत्या बंदीच्या मागणीच्या बाजून आहोत. कारण शेतकरी वाचलाच पाहिजे, जातीव्यवस्था मोडीत निघालीच पाहिजे याबद्दल शंका नाही.
 
सत्ता, गोरक्षक 

               सध्या जे गोरक्षक म्हणून वावरत आहेत, ते बोगस आहेत. माझी एक विचारसरणी आहे. माझं असं म्हणणं आहे. मी एकटा काही संपूर्ण गायी व गुरं वाचवू शकत नाही, हे अगदी स्पष्ट आहे. म्हणजे मी असा विचार करतो की, गिरण्या बंद झाल्या त्यावेळी गिरणी मालकाची काय मागणी होती ? तर ती होती निम्मे मजूर आम्हांला काढून टाकायची परवानगी द्या आणि नवीन यंत्र सामग्री आमच्याकडं येऊ द्या तरच आम्ही मार्केट मध्ये टिकू अन्यथा टिकून राहणं शक्य नाही. कामगार संघटना व आमची मागणी काय होती ? तर एकही मजूर कमी होणार नाही. परिणाम काय झाला ? त्यामुळं शंभर टक्के सगळेच मेले.
               मला तर मुंगीही वाचवायची आहे. अर्थात ते शक्य नाही, याची जाणीव मला आहे. त्यामुळं सगळे बैल काही मी वाचवू शकत नाही. पण किमान अर्धे बैल वाचवू शकतो. असं माझं म्हणणं आहे, कोंबड्यांचे पोल्ट्री फार्म असतात ना तसे फक्त खाण्यासाठीच्या म्हणजेच कापायच्या बैलांचे फार्म काढायला हवेत. त्याव्यतिरिक्त इतर बैल कापता येणार नाहीत. याचं गणित असं आहे, आपल्याला माहिती असेल कोंबडीला तुम्ही 120 दिवसानंतर बदाम जरी खाऊ घातले तरी तिचं वजन वाढत नाही. म्हणजे 120 व्या दिवशी जर ती विकली गेली नाही तर तिचं अर्थगणित मालकाच्या अंगावर पडू लागतं आणि त्यात तोटा होतो. असं म्हणतात बैलाचं मांस स्वस्त मिळतं. ते का स्वस्त मिळतं ? जमिन, चारा गावाचा आणि गावाच्या पाण्यावर बैल वाढतोय आणि आपण तो कापतोय. त्यात कापणाऱ्याची गुंतवणूक काही नाही. पोल्ट्री फार्म सारखा बैलांचा फार्म करा. त्यासाठी आजच्या भावात तुम्हांला जमिन, चारा, पाणी विकत घ्यावा लागेल. त्यानंतर त्या बैलाच्या मांसाची किंम्मत किती असेल. मग आत्ताच्या भावात ते मांस मिळेल का ? त्याचं अर्थशास्त्र बदला. बैलांचे फार्म करण्याचे परवाने सरकारनं द्यावेत.
                यामुळं दोन फायदे होतील, एक, मांसाचे भाव वाढतील. त्यामुळं खाणाऱ्यांची संख्या कमी होईल. दुसरी गोष्ट, आजचे जे बैल आहेत, त्यांचं मांस खाण्यालायक आहे का ? म्हाताऱ्या बैलाचं मांस कसं काय चांगलं असेल ? त्यामुळं लोकं काय करतात, तरूण बैलांचे डोळे फोडतात. पाय कापतात. मग प्रमाणपत्र मिळवून त्याला कापतात. हे करण्याची गरज काय ? बैलांच्या फार्ममुळं चांगलं आरोग्य संपन्न मटन मिळेल लोकांना. महत्त्वाचं म्हणजे एका विशिष्ट कालावधीनंतर बैलाचं वजन वाढणार नाही. त्यामुळं त्याला ठेवणं फायद्याचं नसेल. मग कत्तलखाना टाकावाच लागेल. असं केलं तर अर्धे बैल वाचू शकतील. असा माझा विचार आहे. प्रॅक्टिकली कसं होईल माहिती नाही पण अर्थशास्त्र असंच असेल.
                आम्हांला शेतकरी आणि शेती वाचवायची आहे. शेतकऱ्यांचे बैल वाचले म्हणजे झालं. उर्वरित बैलांचं काय करायचं हा आजच्या दृष्टीनं आमचा प्रश्न नाही. उर्वरित बैलाचं काय ते पाहा. त्यात एक फायदा आहे. मी त्या विषयातला आहे म्हणून बोलतो, आपल्या चामड्यांना मार्केटमध्ये फार किंम्मत नाही. कारण आपल्या बैलांचं अंग काट्यांना वगैरे घासत असतं. त्यामुळं टॅनिंग करताना त्या कातड्यावर खरोच उमटते. ती जास्त स्पष्ट दिसायला लागते. परदेशात बैल गवतावर ठेवल्यामुळं त्याचं जे कातडं आहे, ते व्यवस्थित टिकतं. त्याची मार्केट किंमत वाढते.
               1982 साली विनोबांनी सत्याग्रह सुरू केला होता. त्यावेळी 80 हजार टन मांसाची निर्यात झाली होती. त्याचसोबत 450 कोटी रुपयाचं चामडं निर्यात करून त्या बदल्यात भारतात काय येतं ? तर श्रीमंताच्या गाड्यांसाठी डिझेल आणि पेट्रोल. आपण हे लक्षात घ्यायला हवं, आपल्याला गाडी तर हवी असते. त्यासाठी पेट्रोल कुठून तरी येणार असतं. पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांकडे मांस नाही. त्यानं ते आयात करणं भाग आहे. आपण त्यांना ते पाठवितो. त्यामुळं आपण ज्या गाड्या चालवतो, त्या गाई – बैलांच्या मांसावर आणि रक्तावर चाललेल्या आहेत. त्यामुळं ही कोंडी आहे. पेट्रोल आणणार नाही तर देश चालणार नाही. तुम्हांला हे सर्व पटेल वा न पटेल किंवा आवडेल वा न आवडेल पण ही आर्थिक वास्तविकता आहे.
               आज गोवंश हत्या बंदी कायदा आलेला आहे. मेलेल्या गुरांचं कातडं फूकट चाललेलं आहे. माझ्या गणिताप्रमाणं 43 कोटी रूपयाचं चामडं फूकट चाललेलं आहे. राज्यसभा वाहिनीच्या कार्यक्रमात मी आणि टॅनिंग असोसिएशनचा अध्यक्ष होतो. त्यात तो अध्यक्ष सांगत होता, ‘या कायद्यामुळे चामडं येत नाही. भारतातील चामड्याचं अर्थशास्त्र कोलमडलं.’ त्याला परत उभं करण्यासाठी दोनच पर्याय आहेत. एकतर आपण चामडं आयात करायला हवं किंवा मग आपले गाय बैल कापायला हवेत.
                 आमच्या दृष्टीनं कायदा केला आहे ती चांगली गोष्ट आहे. पण त्या कायद्याचं अर्थशास्त्र चुकीचं आहे. त्यामुळं हा कायदा फार काळ टिकेल असं मला वाटत नाही. उद्या जर सरकार बदललं ना तर नव्या सरकाराला हा कायदा रद्द केल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठीचा दबाब या व्यापारामध्ये काम करणाऱ्यांकडूनच येणार आहे. देवनार कत्तल खान्याचं रक्त, चामडं, मांस विकत घेणारे सर्व जैन आणि पारशी आहेत. हीच लोकं दबाव आणणार आहेत. दबाव आणणारा कोणीही मुस्लिम असणार नाही.  वनस्पती घीमध्ये चरबी टाकणारेच दबाव आणतील. दबाव हा हिंदुमधूनच निर्माण होणार आहे. त्यामुळं हा कायदा फार काळ टिकणार नाही.
                 एक युक्तीवाद सातत्यानं करण्यात येत आहे. म्हातारा बैल विकून थोडा फार पैसा येतो, मग त्यात अजून काही पैसे टाकून नवीन बैल घेता येईल. पण मुळात मला याचं अर्थशास्त्रच कळत नाहीत. म्हाताऱ्या बैलाला आज किंमत आहे का ? हजार रूपयांपेक्षा जास्त कोणीही किंमत देत नाही. बाजारात आज 50 ते 70 हजारांच्या खाली नवीन बैल मिळत नाही. साधा कोकणी बैल घेतला तरी 35 हजारांच्या खाली मिळत नाही. म्हातारा बैल विकून मिळालेल्या पैशात लगेच 34 हजार रूपये टाकून तुम्ही नवीन बैल घेणार हे कसं शक्य आहे. हे अर्थशास्त्र माझ्या समजण्यापलीकडचं आहे.
               म्हाताऱ्या बैलाला सांभाळावं लागतंय, त्याचा आर्थिक बोजा पडतोय हे पटण्यासारखं आहे. पण म्हातारं गुर सांभाळणं का परवडत नाही ? एक तर जमिनीचे तुकडे झाले आहेत. एकत्र कुटूंब पद्धती होती तोपर्यंत ठीक होतं. आता सरकारच सांगतंय, 80 टक्के शेतकऱ्यांकडं फक्त 1 एकर जमिन आहे. त्यामुळं आता बैल जोडी परवडत नाही. गुरांना चरण्यासाठीची गायरान जमिन शिल्लक राहिली नाही. आता बैलच राहिलेले नाहीत. आमच्या गावात बैल नाहीत. माझ्या माहितीप्रमाणे, भवतेक गायरान जमिनींवर दलितांनी आपली पालं ठोकलेली आहेत. आता प्रश्न असा आहे, गाय वाचवायची की मनुष्य वाचवायचा ? त्यामुळं प्रश्न आता कठीण आहे.
                मी हे सर्व अर्थशास्त्रीयदृष्ट्या जरी मांडत असलो तरी, मला वैयक्तिक असं वाटतंय दहशतवाद आणि पाकिस्तान वगैरेंपेक्षा या देशाचा सर्वात मोठा शत्रू कोण आहे ? तर तो आहे इथली गरिबी, जातीव्यवस्था. या शत्रूंपासून जर आपण सुटका करून घेवू शकलो तरच आपण इथं आमन आणि चैन आणू शकू.
             त्यामुळं गोवंश हत्या बंदीचं सर्व अर्थशास्त्र मला कळतं, राजकीय डावपेच कळत आहेत, सोबत हेही कळतय की हे सर्व प्रश्न जातीव्यवस्थेच्या अंताकडं जाणारे नाहीत. त्यात मला जातीअंताची गोष्ट करायची आहे. त्यामुळं मी इतरांकडं दुर्लक्ष न करता, स्वत:ला समजून घेवून माझ्यापुरता विचार करतोय, स्वत:चा मुद्दा लावून धरायचा प्रयत्न करतोय. या सर्वांमधून जातीव्यवस्था कशी तुटणार याचा विचार करतोय. काम करतोय. माझं म्हणणं आहे, डॉक्टर, इंजिनिअर लोकांनी या गुरं कापण्याच्या कामात यायला हवं. हे थोडं हास्यापद आहे. पण ‘भाभा’चा रोबो ड्रेनेजमध्ये तेव्हाच उतरेल जेव्हा सवर्ण समाजाला घाण साफ करण्याचं काम करावं लागेल. जोपर्यंत भंगी हे स्वच्छतेचं काम करतोय तोपर्यंत ते काम करणारा रोबो तयारच होणार नाही. या तथाकथित उच्च समाजाला ‘ड्रेनेज’मध्ये एकदा उतरू द्या. पहिल्यांदा तर तो उतरणार नाही, कारण तो बुद्धीमान वर्ग आहे. ते म्हणतील भाभा मधले रोबो काढा आणि ड्रेनेजमध्ये उतरवा. तंत्रज्ञान हे दलितांच्या हातात नसून ते सवर्णांच्या हातात आहे. त्यामुळं जातीव्यवस्था तोडण्यासाठी तंत्रज्ञान वापरणारच नाहीत.
जातीव्यवस्था मोडण्यासाठी प्रयोग होण्याची गरज आहे. देशात जर कोणी हे प्रयोग केले असतील तर ते महाराष्ट्रानं केले आहेत. बाबासाहेब आंबेडकर इथं जन्माला आले, त्यामुळं महाराष्ट्राचा फायदा झाला. आज महाराष्ट्रात कोणीही जातीव्यवस्थेनं लादलेलं काम करत नाही. विविध प्रयोग महाराष्ट्रात झाले. समतानंदांनी झुणका भाकरीचा प्रयोग केला. एकत्र बसून जेवू म्हणजे जातीव्यवस्था तुटण्यास मदत होईल. आडनावं सांगितल्यानं जाती कळत असतील तर आडनावंच सोडून द्यायचाही एक प्रयोग मध्ये झाला. या प्रयोगांनी जाती व्यवस्था संपली असं माझं म्हणणं नाही. पण जातीव्यवस्था संपविण्याच्या दिशेनं पावलं उचलली गेली. त्यामुळं आपणही त्यादिशेनं प्रयोग करायला हवेत. त्यामुळं मृत गुरांच्या शवविच्छेदनाचं काम मी जातीअंताच्या दिशेनं करतोय. त्याचे फायदे, तोटे, राजकारण, समाजकारण, फुल्याचं - गांधीचं म्हणणं गृहीत धरूनही माझी वाटचाल ही जातीअंताच्या दिशेने कशी होईल या दृष्टीनं मी काम करतोय. 

सदर मुलाखत अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र विशेषांक २०१६ मध्ये प्रकाशित झाली आहे.