Tuesday, April 19, 2016

ग्रामीण पत्रकारिता जिवंत राहूद्या हो...


एखाद्या विषयावर रिपोर्ताजसाठी विशिष्ट भागात गेल्यावर स्थानिक पत्रकारांना भेटत असतो. त्यातून अनेक नवीन लोक भेटत असतात, त्यांचे अनुभवकथन ग्रामीण पत्रकारितेबद्दल विचार करताना महत्त्वाचे ठरते. ग्रामीण पत्रकारिता म्हणताना या ठिकाणी मला शहरी भागात राहून ग्रामीण समाजजीवन अर्थकारण राजकारण यावर भाष्य करणे अपेक्षित नाही तर ग्रामीण भागात काम करणारे जी पत्रकार मित्र मंडळी आहेत त्यांची पत्रकारिता येथे अपेक्षित आहे.

दुष्काळासंबंधी रिपोर्ताज करून नुकताच परतलो पण ग्रामीण पत्रकारितेचा हा अनुभव मनात अनेक घोळ निर्माण करून गेलाय. अर्थात फिरताना आलेले हे दोन वेगळे अनुभव होते पण दोन्ही अनुभव ग्रामीण पत्रकारितेचे भीषण स्वरूप दाखविणारे होते. तसेच मुंबई – पुण्यात बसून ग्रामीण पत्रकारितेबद्दल ठरविली जाणारी धोरणं फक्त त्या भागातील पत्रकारांवरच नाही तर माध्यमांच्या दर्जावरही परिणाम पडणारी आहेत, याची परत एकदा जाणीव झाली.
सध्या माध्यमांमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये एका वर्तमानपत्राची जोरदार चर्चा असते. ती त्याच्या पगार देण्याच्या स्वरूपावरून. बातम्या किती दिल्या यावरून ही माध्यमसंस्था त्यांच्या बातमीदारांना पगार देत नाही तर किती ‘जाहिराती’ आणल्या यावरून ‘कमीशन’ त्यांना मिळते. या जाहिराती मिळविण्यासाठी व पत्रकार किंवा बातमीदार म्हणून दर्जा वा स्थान टिकून राहण्यासाठी त्या माध्यमसंस्थेत काम करणारे पत्रकार काही बातम्या कव्हर करत असतात. बातम्या छापून नाही आल्या तर हा त्या वर्तमानपत्राचा प्रतिनिधी आहे ही ओळखच राहणार नाही, त्याचा थेट परिणाम होतो तो जाहिरातींवर, जाहिराती नाहीत तर कमीशन नाही.  तुम्हांला वाटेल छोट्या शहरांमध्ये हे सर्रास चालते...हो..हो..मान्य आहे. पण हे जे वर्तमानपत्र आहे त्याचा खप हा काही प्रादेशिक नाहीये म्हणून सांगतोय. स्थानिक वर्तमानपत्राचे रिव्हेन्यु मॉडेल आणि या वर्तमानपत्राचे रिव्हेन्यु मॉडेल याची तुलनाच नाही होऊ शकत. 

याच वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीला दोन तीन दिवसांखाली एका तालुक्याच्या ठिकाणी भेटलो. स्थानिक प्रश्नांची योग्य जाण, त्याचे योग्य विश्लेषन त्याच्याकडून ऐकायले मिळाले. बोलता बोलता विषय ग्रामीण पत्रकारितेकडं वळला. “आम्हांला कितीही इच्छा असूद्या नवीन विषयावर लिहायची पण तसं माध्यमच नाही आमच्यासाठी. आत्ता जिथं काम करतोय त्यांना आमच्या स्थानिक प्रश्नांची किंवा बातमीची खोलवर दखल घेण्याची काही गरज वाटत नाही.  फक्त जाहिरातींसाठी काय ते जेवणात लोणचं असावं तशी आमची बातमी”  बोलता बोलताच त्यांनी कॉम्प्युटर चालू केला. स्क्रिन माझ्याकडं वळवली. “आत्ता हीच कालची बातमी बघा, कुकडीच्या पाण्यासंबंधीची बातमी पहिल्या पानावर लावली आहे. पण कुकडीच्या पाण्यासंबंधीचे राजकारण, समाजकारण, अर्थकारण यावर केलेले भाष्य सोडून सगळंच छापलंय.  यांना स्थानिक नेत्यांना दुखवायचं नसतं. चिकित्सा किंवा भूमिका या गोष्टी तर यांच्या मर्यादेपलिकडच्याच. आम्हालाही याची सवय झाली आहे आता, बातमी पाठवितानाच डोक्यात असतं ही माहिती काही छापून येणार नाही पण आपण पाठवत राहायचं. आमच्या जिल्ह्यात या पेपरचा खप सगळ्यात जास्त.  ८ ते १० लाखाच्या जाहिराती या तालुक्याच्या ठिकाणावरून मिळतात. गंभीर विषय हाताळायचेच नाहीत हा अलिखित सल्ला. म्हणूनच तुम्ही जो विषय हाताळायला इथं आलात तो आम्ही इथं असून हाताळू शकत नाहीत. त्यांना सगळंच उथळ पाहिजे असतंय. आता काय आमचं अर्धे जीवन यात गेलं, नवीन काय करायचं म्हटंल तर आता जमत नाही. मागंही जाता येईना आणि पुढंही जाता येईना.” (हे वाक्य मात्र माझ्यासारख्या नवख्या पत्रकारांसाठी गांभिर्याने घेण्यासारखेच होते).

हा अनुभव आला एका तालुक्याच्या ठिकाणी. दोनच पत्रकार विविध माध्यमसंस्थासाठी काम करतात. एक जण जवळपास ६ ७ माध्यमांचे काम करतो. मग बाकी स्थानिक पातळीवर कार्यरत छोट्या छोट्या वर्तमानपत्राची जबाबदारी ही लोकं सांभाळत असतात. सातत्याने फिरताना हा अनुभव येत असतो. 
स्थानिक वर्तमानपत्रे किंवा स्थानिक पत्रकार यांच्याकडं खरंच काम करण्यासारखे अनेक विषय असतात. पण आर्थिक गणितं आणि माध्यमसंस्थांच्या धोरणांमुळे निर्माण झालेल्या मर्यादा अनेक स्थानिक बातम्यांची त्याच ठिकाणी हत्या करत असतात. भारतात दुष्काळ आणि आत्महत्यासंबंधी जर बोलायचे झाल्यास पी. साईनाथ यांचे नाव सर्वात वर येईल. आज संपूर्ण जगाने साईनाथ यांनी केलेल्या भारतातील दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्यांच्या रिपोर्टींगची दखल घेतली आहे. पण साईनाथ यांनी अनेक वेळा या विषयासंबंधीचे क्रेडीट अनेक स्थानिक पत्रकारांना दिले आहे. त्यांच्यामुळेच हे विषय त्यांना मिळाल्याचे ते सांगतात. मला वाटते स्थानिक पत्रकारितेचे महत्त्व स्पष्ट होण्यास एवढं उदाहरण पुरेशे आहे.

दुसरीकडे ज्यांच्याकडून ग्रामीण पत्रकारिता जिवंत राहू शकेल अशी अपेक्षा करता आली असती तेही इतर भांडवली माध्यमसंस्थाच्या पावलावर पाऊल ठेवून वागत आहेत. आम्हांला बातम्यांसाठी कंटेट तर अधिक विद्रोही बंडखोर लागतो पण जिल्ह्याच्या ठिकाणी आम्हांला रिपोर्टर नको आहेत. आम्हांला स्ट्रिंजरच पाहिजेत. त्यांना आम्ही संरक्षण देणार नाही. पण जीव जाईल अशा बातम्यांची अपेक्षा मात्र त्यांच्याकडून राहिल. ग्रामीण पत्रकार असला तरी तो ही या सर्व बाबींचा विचार करतोच. मी जीवावर उदार होऊन गंभीर स्वरूपाच्या बातम्या का मिळवाव्यात, जीवावर एखादा प्रसंग ओढावला तर माध्यमंसंस्थेकडून सुरक्षाकवचही नाही. शेवटी या सगळ्याचा परिणाम बातम्यांच्या निर्माण होणाऱ्या आशयावर होताना दिसत आहे. नुकत्याच नव्याने सुरूवात झालेल्या नवीन मराठी वृत्तवाहिनीने हा ट्रेंड रूजविण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे. त्यामुळे स्थानिक पत्रकारिताच उद्धवस्त होत चालली आहे. या वृत्तवाहिनीचा औरंगाबाद सारख्या शहरातही प्रतिनिधी नाहीये तिथंही स्ट्रिंजरवरच काम भागविण्यात येत आहे. बाकीच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तर विषय सोडाच. 
दुसरा अनुभव हा जर गंभीर आहे. त्याचा अर्थ ज्याचा त्यांनी काढावा. अहमदनगर जिल्ह्यातील एका सौर उर्जा प्रकल्पावर गेलो होतो. माळरानावर हा प्रकल्प उभा आहे. तिथं पोहचणं म्हणजे मोठी लढाई जिंकल्याचेच समाधान. प्रकल्पावर पोहचलो. माहिती मिळवावी हा उद्देश होता. किती क्षेत्र आहे, किती वीज निर्माण होते.  नगर जिल्ह्यातील दुष्काळावरच्या रिपोर्ताजमध्ये हा संदर्भ येईलच म्हणून थेट मुळ मुद्द्यावर येतो. 
तिथं असलेल्या लोकांना माहिती विचारली, त्या प्रश्नांची उत्तरं काही त्यांच्याकडं नव्हती म्हणून त्यांनी थेट मुंबईत बसलेल्या त्यांच्या कायदेशीर सल्लागाराला फोन लावला. इथं एक पत्रकार आलेत त्यांना प्रकल्पाबद्दल माहिती हवी आहे, असं त्या २५ – २६ वर्षाच्या पोरानं त्यांना सांगितलं. मग फोन माझ्या हातात दिला. त्या व्यक्तीचं बोलणं ऐकून धक्काच बसला. “तुम्हाला जी माहिती पाहिजे ती वेबसाईटवर भेटेल. नाहीतर ऊर्जा मंत्रालयाच्या सचिवांना फोन लावून विचार.” मुंबईतल्या कुठल्या तरी एसीमध्ये बसून गरम झालेल्या त्या व्यक्तीचं बोलणं ऐकून घेतलं. मग मी का आलोय हे सांगितल्यावर जर ते सद्गृहस्थ शांत झाले. पुण्यावरून आलोय म्हटल्यावर सभ्यतेच्या भाषेची डिक्शनरी त्यांनी उघडली. सारवासराव करायला सुरूवात केली वगैरे वगैरे.

पण हे सर्व होत असताना फोनवर बोलताना त्यांच्या एका वाक्यामुळे ती व्यक्ती अशी का वागली याचे कारण मिळाले आणि त्याचा संबंध ग्रामीण पत्रकारितेशी होता. तो म्हणाला “ अहो सर कोणीही स्थानिक पत्रकार येतो माहिती विचारतो आणि १५ – २० हजाराची मागणी करतो बातमी न छापण्यासाठी. प्रकल्पात काही त्रुटी नसतानाही सातत्याने नाहक त्रास सहन करावा लागतो.”
जर हे सत्य असेल तर याला जबाबदार कोण ?  माध्यमाच्या ग्रामीण पत्रकारितेकडे पाहण्याच्या बदलत्या धोरणांचे हे अप्रत्यक्ष परिणाम म्हणायचे का ? याची उत्तरं नाहीत आत्ता माझ्याकडं...त्यांचा शोध चालू असेलच.
अहमदनगर जिल्ह्यातील आमचे एक पत्रकार मित्र आहेत. विविध स्थानिक विषय त्यांच्या पत्राकारितेतून राज्यासमोर आले. पण तेही आता ग्रामीण पत्रकारिता नको रे बाबा त्या भूमिकेवर पोहचले आहेत.
हे सर्व लिहिताना ग्रामीण पत्रकारिता जिवंत राहायला हवी एवढंच वाटतं.    कारण देशातील वा राज्यातील बहुतांश लोकसंख्येचा आरसा दाखविण्याची जबाबदारी ग्रामीण पत्रकारितेवर आहे. पुण्या – मुंबईत बसून नाहीत समजू शकणार आपल्याला ग्रामीण भागाचे प्रश्न... त्यामुळं माध्यमांनी आपल्या धोरणांची केंद्र पुण्या  - मुंबईपासून काही प्रमाणात तरी विकेंद्रीत करत ग्रामीण पत्रकारितेचे महत्त्व ओळखून ती संवर्धित करण्याची जोखीम पत्करायलाच हवी.   

लेखकाचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा
http://movementswatch.blogspot.in/
http://bhosaleabhi.blogspot.in/

Thursday, March 17, 2016

नाईट लाईफ इन सर्च ऑफ वॉटर : लातूर ए फोटो स्टोरी

मुंबईत नाईट लाईफ सुरू झाली की, पुण्यातही ती सुरू करावी का म्हणून मी शिकत असलेल्या कॉलेजात एक वृत्तवाहिनेचे प्रतिनिधी आलते. पण नाईट लाईफ हे प्रकरण कोणाला किती आवडले ते माहित नाही पण लातूरकरांना भरपूर आवडले.
लातूरमधल्या पाण्याच्या टाकीवर असणारी गर्दी, हातावर पोट असणारी माणसं रात्रभर रांगेत उभी असतात, मुंग्याच्या गतीनं पुढं सरकणाऱ्या घागरीच्या रांगा, किमान ३ तास तरी रांगेत थांबणं बंधनकारकच, माणसांएवढीच रिक्षा, दुचाकी, हातगाडे, सायकली यांची गर्दी.
रात्रभर पाण्यासाठी ३ - ३ किलोमीटरवरून पायपीट करत फिरणाऱ्या स्त्रिया, ना पोलिस सुरक्षा ना प्रशासकीय व्यक्तीची उपस्थिती. दररोज टाकीवर होणारे वाद. १ - १ किलोमीटरच्या च्या रांगा
ही आहे नाईट लाईफ इन लातूर फॉर वॉटर
कोणाला वाटत नाही दखल घ्यावी याही जगाची......

लेखकाचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा
http://movementswatch.blogspot.in/
http://bhosaleabhi.blogspot.in/

Monday, February 22, 2016

'मॉन्सेंटो’ कंपनीला आमंत्रित करणं देशद्रोह नव्हे का ?

आज देशात सगळीकडे देशप्रेम आणि देशद्रोहाच्या लाटा निर्माण करण्यात येत असून कोणाला तरी त्यात बुडवून संपविण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे.  या सगळ्या गोंधळातच मुंबईमध्ये ‘मेक इन इंडिया’ सप्ताह पार पडला.

या सप्ताहमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी राज्यात गुंतवणूक करावी म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासाठी लाल घड्या अंथरल्या. काही कंपन्यांनी गुंतवणूक करण्याचे आश्वासनही दिले. वृत्तपत्राच्या मथळ्यांनी करोडो रुपये गुंतवणूक होणार असल्याच्या मोठ्ठाल्या बातम्या प्रकाशित केल्या.

त्यात एक मॉन्सेंटो नावाच्या कंपनीनेही राज्यात गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले आहे. हो हो तीच मॉन्सेंटो कंपनी जिच्यामुळे २००२ साली भारतात बीटी कॉटनचा प्रयोग करण्यात आला. २९ मार्च २००२ साली मॉन्सेंटो कंपनीने जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रूव्हल कमिटीकडे बीटी कॉटनची भारतात लागवड करण्यासाठीचा प्रस्ताव पाठविला. त्यानंतर महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि आंध्र प्रदेश अर्थात आत्ताच्या तेलंगना भागातील ५५ हजार शेतकऱ्यांनी बीटी कॉटनची लागवड केली. लागवड केल्यानंतर काही काळ पीक जोमाने वाढले त्यानंतर अचानक त्याची वाढ खुंटली आणि कापसाची ती झाडं जळून गेली.
आंध्र प्रदेशातील एकूण लागवडीच्या ७९ टक्के पीक वाया गेले. तर मध्य प्रदेशमधील संपूर्ण पीक जळून गेलं. महाराष्ट्रातील एकूण लागवड केलेल्या शेतकऱ्यांपैकी ८० टक्के शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. ११२८   कोटी रुपयांचे नुकसान करावे लागले. लागवड केलेल्या शेतकऱ्यांपैकी २०० जणांनी आत्महत्या केली. कायद्यानुसार या सर्व प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी मॉन्सेंटो कंपनीवर आली. पण कंपनीने ती जबाबदारी झटकली आणि २००३ साली बीटी कॉटनचे उत्पादन करण्याचे थांबविले.

ज्या कंपनीने देशातील, राज्यातील शेतकऱ्यांची इथल्या जमिनीशी गद्दारी केली त्या कंपनीला व्हीआयपी पद्धतीची वागणूक देत परत देशातील व राज्यातील शेतकऱ्यांना उद्धवस्त करण्यासाठी आमंत्रित करणं यात कोणत्या प्रकारच्या विकासाची व्याख्या बसते व देशभक्ती निर्माण होते ? 


याच मॉन्सेंटो कंपनीच्या जीएम उत्पादनांवर युरोपीय संघामध्ये बंदी घालण्यात आली आहे. मग आमच्याकडे का या कंपनीला लाल घड्या टाकण्यात येत आहेत. ही मॉन्सेंटो कंपनी बुलढाणा जिल्ह्यात देशातील सर्वात मोठे सीड हब निर्माण करण्याचे सरकारच्या मदतीने स्वप्न पाहत आहे. ज्या कंपनीच्या व तिने निर्माण केलेल्या बियाणांच्या विरोधात जागतिक पातळीवर मोठे आंदोलन उभारण्यात आले आहे. त्या कंपनीला गुंतवणूक करण्यास बोलावून कसला मेक इन इंडिया मुख्यमंत्र्यांना साधायचा आहे.  मेक इन इंडियाच्या नावाखाली दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकऱ्यांसाठी फास निर्माण करण्याच तर हा डाव नाही ना ? की फक्त बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या अर्थिक गरजा भरून काढण्यासाठी देशाचा वापर करायचा म्हणजे देशभक्ती का ? नाही तर मग हाच सर्वात मोठा देशद्रोह आहे. सबंध जगातील शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेल्या कंपनीला आमंत्रित करणं हे फक्त देशद्रोहातच बसू शकते. 

Tuesday, January 12, 2016

सबनीसांचा माफीनामा : भाषिक विविधतेचा पराभव


पुण्यात होऊ घातलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात केलेल्या विधानावरून वाद पेटला किंवा तो पेटविला गेला असंच म्हणणे संयुक्तिक ठरेल. या वादात सनातनचे वकील पुनाळेकर यांनी उडी घेतली आणि संमेलनाध्यक्षांना ‘मॉर्निंग वॉकला’ जाण्याचा सल्ला दिला. सनातन भोवतीचे सध्याचे चर्चेचे वलय लक्षात घेता त्या सल्याचे ‘धमकी’ म्हणून अर्थ काढले गेले. त्याला उत्तर म्हणून पुण्यातील पुरोगाम्यांनी सबनीसांना ‘मॉर्निग वॉकला’ही नेले. पिंपरीचे खासदार अमर साबळे यांनी संमेलन उधळण्याच्या धमक्या दिल्या आणि शेवटी आज श्रीपाल सबनीस यांनी जाहिर दिलगिरी व्यक्त केली.

हा सर्व वाद एका वेगळ्या परिप्रेक्षातून पहायला हवा होता असं मला वाटतं. या वादाने परत एकदा पुरोगाम्यांची भूमिका घेण्याबाबत असणारी गोंधळाची स्थिती समोर आणली.  वादाचे मूळ काय होते ? याची सविस्तर मांडणी करण्यात माध्यमे नेहमी प्रमाणे अपुरी पडली किंवा त्यांनी तसा प्रयत्न केला नाही. वादाचा मूळ मुद्दा हा सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केलेला ‘एकेरी’ उल्लेख  होता. त्यांनी मोदींवर काही राजकीय टिका केली आहे, असेही नव्हते. स्वत : सबनीस यांनी ‘मी मोदींचे कौतूक केले,’ असं वारंवार सांगितलं आहे. दिलगिरी व्यक्त करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेतही त्यांनी मोदींचे कौतुकच केल्याचे सांगितले. म्हणजे हा मुद्दा काही राजकीय नव्हता. तर हा पूर्णपणे भाषिक मुद्दा होता. त्याचे नंतर राजकारण करण्यात आले हे नाकारण्याचे काहीच कारण नाही.
सबनीस हे मुळचे मराठवाड्यातील लातूरचे, महाराष्ट्र – कर्नाटक सीमाभागातील संस्कृतीचा त्यांच्या प्रभाव दिसतो. या सीमा भागात मी अनेक वेळा गेलो आहे. मोठ्यांना अरे तुरे करणे हे या भागाचे ‘भाषिक वैशिष्ये,’ म्हणजे बापाला “काय बापा” असं बोललेले शब्दही या भागात फिरताना आपल्या कानी पडतात. सबनीस त्यांच्या बोलण्याच्या भरात मोंदीबद्दलही एकेरी बोलून गेले. नंतर सबनीस स्वत : म्हणाले  “मी आपल्या बोली भाषेतून भावना व्यक्त केल्या.”
मला वाटतंय ‘बोली भाषा’ हा शब्द या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे. मराठी अशी भाषा आहे, जी प्रत्येक जिल्ह्यानुसार बदलते. म्हणजे सबनीस लातूरचे आहेत, म्हणून लातूरचंच उदाहरण देतो. लातूरच्या उत्तरेकडची म्हणजे रेणापूर, पळशीचा भाग यांची भाषा ही वेगळीच आहे. तर दक्षिणेकडे असणाऱ्या म्हणजे सीमा भागातील भाषा वेगळीच आहे. आपण त्याला त्या त्या भागाची बोली भाषा म्हणतो. माणूस ज्या भौगोलिक भागात वाढतो, त्या भाषेचा त्याच्या संपूर्ण जीवनात बोलण्या – लिहिण्यावर प्रभाव असतो. पण पुण्यातील अशीच काही ठराविक समुदायाची म्हणजे ३ टक्के लोकसंख्या बोलणाऱ्या लोकांची सामाजिक आणि प्रादेशिक मर्यादेत असणारी  एक बोली भाषा आपण प्रमाण भाषा म्हणून स्विकारतो. मग सर्वांनी त्यांचे मूळ सोडून त्याच प्रमाण भाषेचा वापर करावा म्हणून काही जण आग्रही असतात. आणि हीच भाषिक असहिष्णूता या वादाच्या केंद्रस्थानी होती.
मग हा मुद्दा पूर्णपणे का बरं माध्यमातून चर्चिला गेला नाही. का एखाद्या भाषा तज्ञाला बोलवून ‘लिंग्विस्टिक’च्या दृष्टीने यावर चर्चा घडवून आणली गेली नाही ? की माध्यमांनांही फक्त राजकारणच घडवून आणायचं होतं ? कदाचित माध्यमांनी अशा चर्चा घडवून आणल्या असत्या तर  हा वाद वाढलाही नसता. या चर्चांमधून मराठी भाषेची विविधता तरी समोर आली असती आणि मराठी भाषा बोलणारा मराठी माणूस अजून प्रगल्भ झाला असता. त्यातून आमची माध्यमंही विकसित झाली असती. 
संमेलनाच्या स्वागतध्यक्षांनी एक टिपण्णी केली, ‘की हे ११ कोटी मराठी माणसांचं साहित्य संमेलन आहे. त्यामुळे ते नीट पार पाडणं गरजेचे आहे. त्यासाठी सबनीसांनी माघार घ्यावी.’ स्वागताध्यक्षांचा हा पूर्णपणे ढोंगीपणा होता. वर नमूद केल्याप्रमाणे सबनीस बोलले ती सीमा भागातील मराठी भाषाच होती. मग सबनीसांना माघार घ्यायला लावून तुम्ही त्या भागातील मराठी बोलणाऱ्यांचा आणि त्यांच्या भाषेचा अपमान तर करत नाहीत ना ?  जर हा त्यांचा अपमान असेल तर हे साहित्य संमेलन ११ कोटी लोकांचे कसं काय असू शकतं ? म्हणजे हे साहित्य संमेलन फक्त प्रमाण भाषा बोलणाऱ्या महाराष्ट्रातील काय एक १० - १२ टक्के लोकांचंच म्हणावं लागेल. कारण महाराष्ट्रातील बाकीचे मराठी लोक ही प्रमाण भाषा बोलतच नाहीत.
दुसरीकडे पुरोगामीत्वाची पतका खांदावर वाहणाऱ्या भाई वैद्य यांनी सुद्धा एका वृत्तवाहिनीच्या चर्चेत सबनीस ‘जे बोलले ते चुकीचे होते, त्यांनी त्याची माफी मागायला हवी’ असं सांगितलं. भाई वैद्य यांच्याबद्दल आदर ठेवून मला काही प्रश्न उपस्थित करायचे आहेत. माझी अशी धारणा आहे की, पुरोगामी हे प्रत्येक अंगाची मग ती विचारांची, संस्कृतीची आणि अर्थात भाषेच्या विविधतेला समर्थन देतात. किंवा तिचा स्विकार करण्याचा, ती जोपासण्याचा त्यांचा आग्रह असतो. जर सबनीस हे अनेकदा सांगत असतील की ‘ती माझी बोली भाषा आहे’ तर भाईंनी त्यांना माफी मागायला सांगणं हे विचारांची आणि भाषेची विविधता मांडणाऱ्या पुरोगामीत्वात बसते का ? की पुरोगामीत्वाची चळवळ पण पुणेरीच झाली आहे का? भाई वैद्य यांनी ठणकावून का नाही सांगितले की ‘सबनीस जे बोलले ती पण मराठीच भाषा आहे. त्या सीमा भागातील भाषेचे ते वैशिष्ये आहे.’ ‘माफी मागायला हवी’ याचा अर्थ काय घ्यायचा ? 
  त्यामुळे आज दबाबापोटी सबनीसांनी व्यक्त केलेली दिलगिरी ही प्रमाण भाषेचा आग्रह धरणाऱ्यांनी मराठी भाषेच्या विविधतेचा केलेला पराभवच आहे. मराठी भाषेची विविधता आम्हांला अजून समजलीच नाही किंवा समजली असली तरी प्रमाण भाषा लादण्याचा आमचा हट्टयोग अजून संपलेला नाही. 
आता या संदर्भात जे राजकारण झालं त्यावरही बोलणं गरजेचं आहे. एकीकडे मोदींच्या धार्मिक, राजकिय, अर्थिक, सामाजिक धोरणांना विरोध करणारे सबनीस यांची अभिव्यक्ती जपण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहिले. ही बाब स्वागतर्हाच आहे. पण सबनीसांनी मोदींचे केलेले कौतूक म्हणजे त्यांच्या धोरणांचे कौतूक होते. मग ही धोरणं सामाजिक, धार्मिक, राजकिय सर्वच बाबीतील असू शकतात.

मग एकीकडे धार्मिकतेला विरोध करायचा आणि त्याच धार्मिकतेला खतपाणी घालणाऱ्या विचारांचे समर्थन करणाऱ्यांचेही समर्थन करायचे. ही बाब सध्याच्या परिस्थितीमध्ये अतिशय घातक असल्याचे माझे मत आहे. आणि सबनीस यांच्या अभिव्यक्तीवर कोणत्या प्रकारे गदा आली हे काही मला अजून कळालेले नाही. त्यांनी नरेंद्र मोदी यांचे करायचे तेवढे कौतूक केले आहेच की. त्यामुळे या वादामुळे परत एकदा पुरोगामीत्वाची धुरा सांभाळणाऱ्या मंडळींचीं गोंधळाची परिस्थिती समोर आली.
शेवटी विरोधाची धुरा सांभाळणारे आणि ज्यांनी धमक्यांचा महापूर आणि निषेधाचे सोहळे भरवले त्यांच्याबद्दल. रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले व भारतीय जनता पक्षाचे खासदार अमर साबळे यांनी श्रीपाल सबनीस यांनी माफी मागितली नाही तर संमेलन उधळून टाकण्याच्या धमक्या दिल्या. कदाचित या दोन्ही नेत्यांना माहिती नसेल की, प्रमाण भाषेच्या आग्रहावरून फक्त ग्रामीण माणसालाच नाहीतर इथल्या दलित आदिवासींना अनेक ठिकाणी नाकारण्यात आले आहे. त्यांची संस्कृती नाकारली गेली. त्याच दलित समाजाचे नेतृत्व करीत असल्याचा आव खासदार अमर साबळे आहे आणि रामदास आठवले यांनी आणला आहे. अमर साबळे यांना खासदारकी मिळाली त्याचे आभार ते पक्षाकडे अशा प्रकारे व्यक्त करत आहेत. तर रामदास आठवले यांनी फक्त आता खाकी चड्डी घालायची बाकी आहे.
शेवटी हा सर्व वाद भाषिक परिप्रेक्षातून पाहिला गेला असता, चर्चिला गेला असता तर तो कदाचित एवढा वाढलाही नसता. सबनीस यांनी आज मागितलेली दिलगिरी ही राज्यातील अनेक वेगवेळ्या धाटणीची मराठी बोलणाऱ्या महाराष्ट्रातील माणसांचा अपमान होता. मराठी भाषेच्या विविधतेचा तो पराभव होता. पुण्याबाहेर बोलल्या जाणाऱ्या भाषेचं स्थान काय ?  हा प्रश्न आज परत एकदा निर्माण झालाय. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे संमेलन नक्की कोणाचं आहे ? याचं उत्तरही मिळालं आहे.
टीप - माझं सबनीस यांना फक्त भाषिक विविधतेच्या दृष्टीकोनातून समर्थन आहे. सबनीस यांना काही एक ठोस राजकीय किंवा सामाजिक भूमिका आहे अशी माझी बिलकूल अंधश्रद्धा नाही.  

लेखकाचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा
http://movementswatch.blogspot.in/
http://bhosaleabhi.blogspot.in/

Friday, January 1, 2016

त्यांच्या हत्या आणि आत्महत्येलाही शुभेच्छा

        रात्रीचे साडेबार वाजलेत, नव वर्षाचं स्वागत जोरदार चालू आहे. नववर्ष स्वागताचा उत्सव चालू आहे. मागील 3 दिवसापासून लातूरमध्ये आहे. 20 दिवसापासून नळाला पाणी नाही. अर्ध्या तासापूर्वी एकीकडे नववर्षाचे स्वागत तर दुसरीकडे सोसायटीमधील पाण्याच्या टाकीवरून पाणी नेणाऱ्या बाया दिसत होत्या. त्यांच्य़ासाठी कुठलं आलंय होय हो नवं वर्ष. ज्या दिवशी पाणी सुटेल आणि लांबून कुठून तरी पाणी आणायचा त्रास ज्यादिवशी नसेल तेच काय त्यांच्यासाठी सेलिब्रेशन...

        उत्सव, सेलिब्रेशन आपल्याला समाज वास्तवापासून दूर नेत कुठं तरी अभासी जगात वावरायला भाग पाडतात. मागील वर्षी म्हणजेच 2015 मध्ये मराठवाड्यात प्रत्येक आठवड्यात सरासरी 30 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या (संदर्भ – कॅचन्यूज.कॉम). त्याच मराठवाड्यातील लातूरमध्ये रात्री 12 च्या सुमारास या फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली, आता हे नव्या वर्षाचे सेलिब्रेशन होते की, आमच्या आजूबाजूला राहण्याची तुमची लायकी नाही. बरंय तुम्ही आत्महत्याच करा. आमच्या विकासाच्या मॉडेलवर तुम्ही डाग आहात, त्यामुळं मागील एक वर्षात तुम्ही स्वत:हून आत्महत्या करून आमच्या विकासाच्या चेहऱ्यावरचे डाग कमी केलेत त्याचं हे सेलिब्रेशन असावं असाच संदेश माझ्यासारख्या पर्यंत पोहचला आहे.

        काल वर्षाचा शेवटचा दिवस, मागील वर्षाचा आढावा आमच्या वृत्तवाहिन्यांनी चटपटचीने घेतला. बाहुबलीचा गल्ला किती झाला ? बजरंगी भाईजानचा गल्ला किती झाला ? मोदींच्या परदेश वाऱ्यांनी काय मिळालं ?  असं मस्त तळलेलं पॅकेज दिवसभर रन केलं जात होतं.

       माझ्याही मनातील मागील वर्षातील काही हत्या आणि आत्महत्यांच्या आठवणी जाग्या झाल्या. मागे झालेल्या किंवा तुम्ही आम्ही सर्वांनी केलेल्या हत्यांचे काल सेलिब्रेशन झाले आणि पुढे आम्ही सामूहिकरित्या, धर्मनिरपेक्ष पद्धतीने करणार असलेल्या हत्यांनाही आपण शुभेच्छा देऊयात.

        नोव्हेंबरची 8 तारीख असेल, नंदूरबारमधील मोलगी गावापासून 10 -15 किलोमीटर अंतरावर असलेल्या दहेल गावी मुक्कामी होतो. लाईटची व्यवस्था नसलेलं गाव, संपर्काची साधने नव्हती. आजारी पडल्यास मोलगीच्या दवाखान्याशिवाय दुसरी व्यवस्था नाही. बाज्याभाऊची मुलाखत घ्यायला दहेलला गेलो होतो. रस्त्यापासून बाज्याभाऊचं घर 3 4 किलोमीटर आत पाड्यावर, रात्री उशीर झाल्यामुळे पाड्यावर न जाता गावातल्याच एका घरी मुक्काम केला. तिथं गेल्यावर कळलं की, बाज्याभाऊच्या घरी मयत झाली आहे. त्यांची भावजयी वारली आहे आणि नुकताच अंत्यविधी झालाय पण बाज्याभाऊ दुसऱ्या दिवशी तुम्हाला नक्की भेटेल. सकाळ पासून बाज्य़ाभाऊची वाट पाहत होतो. संपर्काची साधने नसल्यामुळे भेटायच्या ठरलेल्या ठिकाणी आम्ही उभे होते. पण बाज्याभाऊचा काही पत्ता नाही. मग थेट पाड्यावरच्या त्यांच्या घरी गेलो. घरी मयत झाल्याने वातावरण कसे होते ते वेगळं सांगण्याची गरज नाही. बाज्याभाऊच्या बोलण्यातून जे काही आलं ते सुन्न करणारं होतं.

        त्यांच्या भावजयीचं ऑपरेशन झालं होतं, पण त्यानंतर पेशंटला लावण्यासाठी असलेल्या ऑक्सिजनची फक्त एकच छोटी टाकी मोलगीच्या आरोग्य केंद्रात उपलब्ध होती. अर्थात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे आमच्या विकासाच्या चकाट्या पेटणाऱ्या भारतातील आदिवासीचा मृत्यू झाला असेल हे पटणारही नाही. त्यांच्यासाठी कुठं आलंय हो नव्या वर्षाचे सेलिब्रेशन. तो फक्त मृत्यू नव्हता तर माझ्या तुमच्या सुखासीन आयुष्यासाठी जी धोरणं रावबिण्याचा घाट इथल्या व्यवस्थेने घातला आहे, त्या सर्वांनी केलेला हा कोल्ड ब्लडेड मर्डर होता. कदाचित काल रात्री पार पडलेलं सेलिब्रेशन त्यासाठीही होतं.

        सिलिकॉन व्हॅलीमध्ये जाऊन आम्ही देशाला डिजीटल करायला निघालो आहेत. डिजीटल स्वरूपातील आचार, विचार, मरण सगळं स्वस्त झालंय ना, फक्त जगणं तेवढं महागलंय. 2015मध्ये लॅन्सेट जर्नलच्या अंकात भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवेच्या निधीमध्ये 50 टक्क्याहून जास्त कपात करण्यात आल्याचा अहवाल छापण्यात आला होता. कापलेला 50 टक्के निधी कुठे वळविण्यात आला याबाबत मात्र काही माहिती देण्यात आली नव्हती. काल सकाळी टि. व्ही. लावला. एनडीटीव्हीवर बातमी चालू होती, महाराष्ट्रातील आरोग्य सेवा महागणार... एवढी मोठी बातमी जी तुमच्या माझ्या सर्वसामान्यांच्या, राज्य़ातील 70 ते 80 टक्के लोकांच्या जीवनावर परिणाम टाकणारी होती. पण सेलिब्रेशनच्या त्या रंगारंग थर्टी फस्टमध्ये महाराष्ट्रातील प्रादेशिक माध्यमांना त्याची जराशीही दखल घ्यावी वाटली नाही. आज सकाळी पेपर पाहिले तर कोणत्याच वर्तमानपत्रात त्याची बातमी नाही. म्हणजेच न छापता आम्ही पुढच्या वर्षी होणाऱ्या हत्यांनाही शुभेच्छाच दिल्या.

        व्हॉट्सअपवर शुभेच्छाचे मेसेज येत होते. तसे मला अन्वीक्षण मासिकाच्या अंकातून दत्ता थोरेंच्या लेखातून भेटलेला कांबळे आठवला. बाबासाहेंबांनी दिलेल्या स्वाभिमानाच्या विचारातून गटार साफ करण्याचे काम सोडणाऱ्या कांबळेंना दुष्काळाने परत एकदा हात गटारातच घालायला लावले. कॉलेजला जाताना प्रवासासाठी लागणाऱ्या बसच्या पासचे पैसे नसल्याने आत्महत्या करणाऱ्या त्या मुलीच्या घरी कसे असेल आजचे सेलिब्रेशन... त्या आत्महत्या केलेल्या 5000 शेतकऱ्यांच्या घरी कसे असेल नववर्षाचे सेलिब्रेशन ? रात्री 12 वाजता लुनावर 10 10 घागरी पाणी नेणाऱ्या माणसाच्या घरी केस असेल सेलिब्रेशन.

        रात्रीच्या रंगारंग कार्यक्रमात, चर्चांमध्ये, पॅनेल डिस्कशनमध्ये का नाही उमटले शेतकऱ्यांच्या, आदिवासींच्या आत्महत्यांचे, हत्यांचे प्रतिबिंब... का नाही झाली चर्चा पुढच्या वर्षात त्यांना कसे जगविता याची... का घेतला गेला नाही आमच्या समोरच्या समस्यांचा वेध कारण आम्ही सेलिब्रेशनची भूल घेतली होती. त्याच भूलीत आम्ही चर्चा केली नाही वास्तवाची म्हणजेच येऊ घातलेल्या वर्षाला नाही तर होऊ घातलेल्या आत्महत्यांनाच आम्ही शुभेच्छा देत आहोत. सकाळीच बातमी वाचली, मुख्यमंत्र्यांच्या मराठवाडा दुष्काळ दौऱ्यावेळी लातूर जिल्ह्यात कशाबशा चार चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या, मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवल्या फिरवल्या त्यातील दोन बंद केल्या होत्या, तर उरलेल्या दोन काल बंद झाल्या. नवीन वर्ष सुरू झालं, पावसाळ्याला अजून 6 महिने बाकी आहेत, त्यात कडक उन्हाळा आडवा असेल. धरणातील पाण्याने गाळ गाठला आहे. लातूरासारख्या शहराला फेब्रुवारीपासून पाणीपुरवठा बंद असणार आहे. मग बाकीच्या उस्मानाबाद, बीड, हिंगोलीची तर गोष्ट लांबचीच आणि गावांचीही लांबचीच. मराठवाड्याचा नैसर्गिक दुष्काळ कधीचाच मागं पडलाय, आता आहे तो राजकीय आणि धोरणांचा दुष्काळ...बरं आता हा शोध कोण लावला याच्याशी आपल्याला काय देणं घेणं ? आपलं कसं मस्त चाललंल ना मग चालू द्या सेलिब्रेशन... जनतेच्या राजानेही कधी काळी दुष्काळ भागाचा दौरा केला, राजकारण केलं आणि दुष्काळ तीव्र झाल्यावर मात्र वाढदिवसाचं सेलिब्रेशनही केलं, आता त्यांना कोण प्रश्न विचारणार ना ? राज्यातील शेतकरी आत्महत्या करत असताना मोदींपासून येचूरीपर्यंत सर्वजण त्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झालेत. म्हणून तर आमच्याकडं उत्सवं असतात, प्रश्नांची दाहकता हळूवारपणे कमी करण्याचे सर्वाधिक प्रभावी माध्यम म्हणजे उत्सव...  

         आज काल असं काही लिहायचं म्हटलं की दडपण येतं, गरवारे महाविद्यालयात एम. एस्सी करत असताना एक प्राध्यापक होते, तसे फॉरेन रिटर्न... विदर्भात कडक दुष्काळ पडला होता, आसारामांचा रंगपंचमी निमित्त नागपूरला कार्यक्रम झाला. लाखो लिटर पाणी उडविण्यात आले. त्यावर बोलत असताना, आमच्या त्या प्राध्यापकांनी प्रतिक्रिया दिली, की तिकडं पाणी नाही किंवा दुष्काळ आहे म्हणून आम्ही का आमचे उत्सव साजरे करायचे नाहीत. ही प्रतिक्रिया इतकी भावना आणि विचार शून्य होती की त्यानंतर दुष्काळ आणि उत्सव यावर काही लिहायचं म्हटलं तर उत्सवासाठी पिलेली अफू जोपर्यंत परिघातील लोकांमधून निघून जात नाही तो पर्यंत लिहिलेलं ब्लॉगवर टाकायंच नाही असं ठरवलं होतं. म्हणून रात्री न टाकता हा ब्लॉग आता टाकत आहे. नाहीतर सकाळ सकाळी मलाच काय भोसल्या तू लई बोर आहेस राव, तुम्हांला दुसरं काही सूचत नाही बाबा सारखे मेसेज वाचायला मिळाले असते. 

        आम्हांला काही सुचे की नाही सुचो बाबा पण बळीचं राज्य येण्यासाठीच्या कल्पना तुमच्या डोक्यात येवो नाहीतर तुमच्या या शुभेच्छा नववर्षाला होत्या की, आत्महत्यांनां हे 31 डिसेंबर 2016 ची रात्रच सांगेल.  डोक्याला झिणझिण्या आल्या असतील तर चल सोड रे म्हणून रात्रीची उरलेली घ्या थोडी सगळं विसरून जाल....

लेखकाचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

http://movementswatch.blogspot.in/
http://bhosaleabhi.blogspot.in/