..........................................
१. स्थळ : पुण्यातील भांडारकर रोडवरील कमला नेहरू पार्क... उच्च मध्यमवर्गीय-उच्चभ्रू लोकांचे हे विरंगुळ्याचे ठिकाण... एकीकडे संपूर्ण भारतभर आंबेडकर जयंतीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. केंद्रातील, राज्यातील सत्ताधारी, राजकारणी, त्यांच्या मातृसंस्था आंबेडकरांना डोक्यावर घेत होत्या. वस्त्यांमधून जयंती मिरवणुकांना सुरुवात होणार होती. त्याच वेळी या कमला नेहरू पार्कमध्ये कुटुंबासह येणाऱ्यांच्या कानांवर पार्कच्या मध्यभागी बसलेल्या एका ग्रुपच्या चर्चेतून जात, हिंदू धर्म, जाती निर्मूलन हे शब्द कानावर पडत होते. पुण्यातील काही समविचारी मित्रांनी/तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘कारवाँ’ गटातर्फे रोहित वेमुलाची आत्महत्या, पुण्यातील एफटीआयआयचं प्रकरण आणि एकूणच देशातील सामाजिक-राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर डॉ. आंबेडकर लिखित ‘अनहिलेशन ऑफ कास्ट’चं अभिवाचन सुरू होतं. काही जण त्याकडे गांर्भीयाने पाहात होते, ऐकत होते, बघणाऱ्यांतले दोन-तीन जण त्या गटात सहभागीही झाले; बाकी मात्र त्यांच्याकडे पाहून नाकं मुरडत, तुच्छतापूर्वक कटाक्ष टाकत आपलं मनोरंजन करून घेत होते. त्यानंतर बरोबर एक महिन्याने १४ मे रोजी परत याच ठिकाणी याच तरुणांनी ‘कास्ट इन इंडिया’ या ग्रंथाचं अभिवाचनही केलं होतं...
वेगवेगळ्या गटांकडून छोट्या प्रमाणात विविधांगी विषयांना हात घालणाऱ्या, भाष्य करणाऱ्या या रंगमंचावरून कधी नव्हे ती थेट आंबेडकरांना बोलण्यास, व्यक्त होण्यास जागा मिळाली होती. पुस्तकातील शब्द जसे कानावर पडत होते, तशी स्क्रिनवर दाखवली जाणारी उनामधल्या मारहाणीची दृश्ये त्या वाक्यांचे वर्तमान संदर्भ देत होती आणि प्रयोगाच्या शेवटी दाखवलेलं रोहितचं पत्र आंबेडकरांच्या या पुस्तकाची वर्तमान गरज प्रेक्षकांच्या मनात पेरत होतं...
---------------------------------
अनुज ज्याच्यासाठी लहानपणापासून आंबेडकर म्हणजे, कधीही काहीही संबंध नसलेला माणूस. पुणे विद्यापीठात तत्त्वज्ञानाचं शिक्षण घेत असताना अपघातानेच आंबेडकरांची त्याला ओळख झाली. सावरकर, गांधी वगैरे पर्याय असताना काहीतरी नवीन जाणून घेण्याच्या उद्देशानं अनुजनं आंबेडकरांचं तत्त्वज्ञान, हा पेपर निवडला. कॉलेज जीवनापासून नाटकात काम करायचा.
वडिलांची स्वत:ची लायब्ररी. तरीही आंबेडकर मात्र त्याच्यापासून कोसो दूरच होते. पण जेव्हा त्यानं आंबेडकर वाचला, त्यानंतर मात्र त्याला हे आंबेडकरांचे मूळ विचार त्यांच्याच शब्दात जसेच्या तसे ‘पब्लिक स्पेस’मध्ये घेऊन जाण्याची गरज वाटली. त्यासाठी अनुजनं रंगभूमीची निवड केली. ‘अनहिलेशन ऑफ कास्ट’मधील उतारे, जाती निर्मूलनाची गाणी आणि दलित चित्र/ छायाचित्र कलेचा आविष्कार असा संगम साधत त्यानं आणि त्याच्या ग्रुपने सादर केलेला रंगभूमीवरील ‘अनहिलेशन ऑफ कास्ट’च्या अभिवाचनाचा प्रयोग नुकताच पार पडला, त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. प्रयोगाच्या शेवटी नागरिक आपल्याही भागात हा प्रयोग करण्याचं आमंत्रण अनुजला देताना दिसत होते. या सगळ्या प्रवासात अनुजला समजत गेलेली कलेतली दलित अभिव्यक्ती खूप महत्त्वाची वाटते. आजच्या निर्माण होत चाललेल्या धर्मांध वातावरणाला आंबेडकरच पर्याय आहेत, असे अनुजला वाटते. रंगभूमीवरील प्रयोगातील आणखी एक जण म्हणजे सिद्धार्थ. तसा तो जाती-धर्म यातून बाहेर पडलेला. स्वत:चा विचार आणि विवेक असलेला. या प्रयोगाच्या निमित्तानं पहिल्यांदा सिद्धार्थनं आंबेडकरांचं मूळ लिखाण वाचलं. त्याच्यासाठी हे खूप महत्त्वाचं होतं, कारण हे वाचल्यानंतर आता त्याला आपण जे वागत होतो, ते काही चूक नव्हतं, असं वाटतंय. त्याच्या जीवनाच्या पुढच्या प्रवासासाठी आंबेडकर त्याला सहप्रवासी म्हणून लाभलेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, सिद्धार्थला आता घरच्यांशी किंवा नातेवाइकांशी वाद घालत बसण्यापेक्षा ते का तसं वागतात? ते का तसा विचार करतात? ते समजून घेणं, त्याचा विचार करणं महत्त्वाचं वाटतंय. काही प्रमाणात जातीचा न्यूनगंडही आता मनात निर्माण झाल्याचं तो बोलून जातो. पण दुसरीकडं नातेवाइकांसाठी मात्र सतत आजूबाजूला दिसणारी आंबेडकरांची पुस्तकं अनुज आणि सिद्धार्थ चुकीच्या मार्गाला लागलेत, याचं प्रमाणपत्र देण्यासाठी पुरेशी ठरतात, असं दोघंही आवर्जून नमूद करतात. राहुलला मात्र आंबेडकर नवीन नाहीत. त्याचेे आजोबा रामचंद्र गायकवाड हे जलसाकार. त्यामुळे लहानपणापासून तो ऐकत, वाचत आलाय, तरी या सर्व रंगभूमीच्या प्रवासामध्ये त्याचीही घुसमट होतेय. मुळातल्या लिखाणात जाऊन वाचनात आलेला आंबेडकर आणि आजूबाजूला दिसत असलेला, सांगण्यात येत असलेला आंबेडकर यात फरक असल्याचं त्याचं म्हणणं आहे. पण तो निराश नाहीये. फक्त राहुलच नाही, तर ही सर्व तरुण पिढी निराश नसून, उलट ती अधिक खोलवर जाऊन आंबेडकराचं मूळ लिखाण वाचायचा प्रयत्न करतेय.
http://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAG-abhishek-bhosle-write-about-80-years-complete-to-dr-5404786-PHO.html