Saturday, April 1, 2017

कादंबरी ते अनुभव...


काल काही कामानिमित्त पुण्याजवळच्या लव्हाळे भागातील डोंगराळ भागात जाण्याची संधी मिळाली होती. सोबत सतत या भागात जाणं येणं करणारा मित्र होता. या भागातील सामाजिक, राजकीय आणि अर्थिक परिस्थितीची चांगली माहिती त्याला होती. रस्त्याच्या बाजूलाच डोंगर फोडून चालू असलेलं वॉटर पार्कचं चालू असलेलं काम दिसत होतं. अख्ख्या डोंगरांची वाट लागली आहे. पोखरलं गेलंय सगळं. डोंगराच्या वरच्या टोकावर पोहचल्यावर खाली दिसणारा पाण्याचा बंधारा दाखवत तो सांगू लागला.

ते बघ अभ्या,  डोंगराच्या त्या बाजूला अजून असाच एक बंधारा आहे. ही आजूबाजूची गावं आणि नदीला जाणारं पाणी हे बंधारे बांधून अडवण्यात आलंय. पलीकडं एक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कंपनीचा गोल्फ क्लब आहे. ते पाणी त्या गोल्फ क्लबच्या हिरवळीसाठी वापरण्यात येतंय. आणि कोणी काही बोलतही नाही राव.. कोणी बोललं की एका पाठोपाठ 10 – 12 चारचाकी येतात आणि त्यातून येणारी लोकं ठोकत्यात जो आवाज करेल त्याला. त्यामुळं कोणी काही बोलत नाही.
तो हे सांगत होता आणि मला मात्र या अनुभवानं तोरणमाळमध्ये नेऊन ठेवलं होतं. दिनानाथ मनोहरांची फत्ते तोरणमाळ नुकतीच वाचण्यात आली. भौगोलिक दृष्ट्या मी जिथं उभा होतो ते ठिकाण आणि तोरणमाळ 600 किलोमीटर वगैरे दूर असतील. पण बाजार केंद्रस्थानी ठेवणाऱ्या संस्कृतीने मात्र दोन्हीकडं सारखेच प्रश्न निर्माण केलेत. हे प्रश्न निर्माण होत असताना किंवा आपल्यासमोर आ वासून उभे असताना साहित्यात त्याचं प्रतिबिंब उमटत राहणं समाजाच्या मृत नसण्याचं लक्षण ठरावं. म्हणून फत्ते तोरणमाळ कादंबरी महत्त्वाची वाटतेय आणि त्या अनुषंगाने लिहिण्याचा हा प्रयत्न.  

आदिवासी भागात काम केल्यामुळं त्यांच्याशी निर्माण झालेली नाळ दिनानाथ भाऊंच्या लेखनात सातत्यानं प्रतिबिंबित होते. फत्ते तोरणमाळ देखील त्याच आदिवासी समाजाच्या अस्तित्व टिकविण्यासाठीच्या संघर्षावरची कादंबरी आहे. पण अस्तित्वावर घाला घालणारा शत्रू मात्र बदललाय. तो आता बहुराष्ट्रीय झालाय, तो शहरापुरता मर्यादित राहिला नाही. त्याचा चेहराही शत्रू म्हणून तुमच्या समोर स्पष्ट नाहीये, तो तुमच्यात वावरणाऱ्याच्याच वेशात तुम्हांला उद्धवस्त करू पाहतोय.  

एनजीओ नावाचं दुकान वीज पोहचण्याआधीच सर्व आदिवासी भागात पोहचलंय. चळवळी मोडीत काढणं, त्यांचा जन्म न होवू देणं ही कामं अतिशय निष्ठेनं एनजीओवाली मंडळी करत असतात. अशाच एक एनजीओ काम करणारा हरिश, चित्र काढण्यासाठी काकडपाड्याला आलेली सुचेता आणि मुंबईच्या कामगार चळवळीतील पण लेखन करण्यासाठी तोरणमाळला आलेला डिकी आणि स्थानिक श्रावण ही माझ्या दृष्टीने कादंबरीची महत्त्वाची पात्रं.

विकास करण्यासाठी स्वीकारलेल्या जागतिकीकरणानं आमची विकासाची व्याख्यात उचकटून टाकली. विकासाच्या व्याख्येपासूनच विकासाच्या संकल्पनेची गुंतागुंत निर्माण झालेली आहे. विकासासाठी सातत्यानं नख लावलं जातंय ते म्हणजे निसर्गाला, पर्यावरणाला, साधनसंपत्तीला, नैसर्गिक स्त्रोतांना त्यातल्या त्यात पाणी ही जास्त संवेदनशील बाब.
 तोरणमाळमधील धबधब्याने उमरी नाल्याचा उगम होतो. या उमरी नाल्यामुळं या भागातील आदिवासी तग धरून आहेत. पण ट्रांस अटलांटा या मल्टीनॅशनल कंपनीला तोरणमाळ पर्यटन ठिकाण म्हणून विकसित करायचंय. त्यासाठी उमरी नाला आडवायचा घाट घातला जातोय. त्याविरोधात उमरी नाला बचाव समितीनं रचलेला यशस्वी संघर्ष म्हणजे फत्ते तोरणमाळ... कथा सांगण्यापेक्षा किंवा विश्लेषण करण्यापेक्षा आजच्या काळात ही कादंबरी मला का महत्त्वाची वाटतेय, ते लिहिणं जास्त महत्त्वाचं आहे.

कादंबरीतील प्रत्येक पात्रं ही आजच्या काळाचे प्रतिनिधी आहेत. शहरी ग्रामीण अवकाशामध्ये वावरत असताना निर्माण झालेला क्रायसिस, मग तो चळवळीचा असो वा नातेसंबंधांचा, तो कादंबरीमध्ये सातत्याने उभा राहतो. चळवळ म्हटलं की आज परत त्याची एक स्टीरीओटाईपड् अशी व्याख्या मनात रूजलेली असताना कादंबरीत दाखविलेला संघर्ष हा ती प्रतिमा मोडण्यास मदत करणारा आहे. कादंबरीमध्ये उभारलेला संघर्ष ज्या भौगोलिक भूभागात जन्माला येतोय त्याला श्रमिक चळवळीची पार्श्वभूमी आहे. त्याचं प्रतिबिंब सातत्याने कादंबरीत उमटत राहतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सूचेता, डिकी ही माणसं चळवळीचा कणा असली तरी नेतृत्व मात्र त्यांच्या हातात ठेवत नाहीत आणि माझ्या दृष्टीकोनातून ही सर्वात महत्त्वाची बाब. श्रावण सारखं नवं स्थानिक नेतृत्व जन्माला घालणं ही बाब श्रमिकच्या प्रतिबिंबच..

आजच्या सर्व गुंतागुंतीच्या प्रश्नांवर आणि एन्ड ऑफ आयडॉलॉजी व एन्ड ऑफ मूव्हमेंटच्या काळात फत्ते तोरणमाळ नक्कीच महत्त्वाची कादंबरी आहे.

                                                                                                                                               
शेवटी कादंबरीत आडविल्या जाणाऱ्या नाल्यासाठी आदिवासी समाज एकवटतो संघर्ष निर्माण करतो. सरकारला माघार घ्यायला भाग पाडतो. पण काल मी जिथं गेलो होतो तिथं मात्र सूचेता, श्रावण जन्माला आले असतील ना... पण कोंब फूटत असतानाच ती छाटली गेली असतील का ? किंवा त्यांचा जन्म व्हावा अशी संवेदनशीलताचा शहरानं मारून टाकली असावी का ? फत्ते तोरणमाळच्या कादंबरीतील मांडलेला पर्यावरणावरील, त्यावर अवलंबून असलेल्यांच्या अस्तित्वावरचा हल्ला कधी काळी वास्तवात मी उभा होतो तिथं झाला होता, पण त्याची ना कोणी दखल घेतली ना त्याचं साहित्यात रुपांतर झालं. त्यामुळं फत्ते तोरणमाळ अशा किती तरी समोर न आलेल्या हल्ल्यांची आणि दाबल्या गेलेल्या चळवळींची प्रतिनिधी आहे.  

1 comment:

  1. मानव प्रजातीचं अस्तित्व आणि तथाकथिक विकास ह्यामधील वाढता आंतर्विरोध तीव्रतरच होत जाणार आणि ह्यातून निर्माण होणाऱ्या समस्या ह्या स्थानिक ते जागतिक पातळीवर सर्वच सजीवांना जाचक होत जाणार.

    ReplyDelete