Sunday, November 20, 2016

सोशल मिडिया आणि लैंगिक संवाद

             आज आपण सर्व कमी अधिक प्रमाणात का असेना पण सोशल मिडियाच्या आहारी गेलो आहोत, कोणीही हे नाकारण्याचे धाडस करणार नाही. काही जणांच्या मते, सोशल मिडिया ही काळाची गरज आहे त्यामुळं त्यात सहभागी असणं गरजेचं आहे, तर काही जणांच्या मते, सोशल मिडियापासून दूर राहायला हवं. अर्थात असे भिन्न प्रवाह असणं हेही मानवाच्या जिवंतपणाचं लक्षण समजायला हवं. विचार करणं हा जसा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, तशीच लैंगिकता ही गोष्ट देखील सजीवाच्या जीवनातील अविभाज्य गोष्ट आहे.
                 या ठिकाणी लैंगिकतेचा विचार करताना फक्त स्त्री - पुरुषांचे लैंगिक शारिरीक अवयव आणि संभोग एवढाच संकुचित आणि मर्यादित अर्थ अपेक्षित नसून, तुमची लैंगिक ओळख, लैंगिकतेसंबंधीचे अनुभव, विचार, संकल्पनांचाही समावेश होतो. सोबतच तुम्ही ज्या समाजाचे प्रतिनिधित्व करता त्या समाजातील माध्यमव्यवस्था, कुटूंबव्यवस्था, अर्थिक स्तर या सर्व बाजूंचा विचार करून सदर विषय समजून घेतल्यास आधिक व सर्वसमावेशक आकलन होण्याची शक्यता आहे. पहिल्यांदा एक गोष्ट मनात कोरून घेण्याची गरज आहे ती म्हणजे, आज आपण जी स्वत:ची लैंगिकता  - लैंगिकता म्हणून मिरवतो ती नैसर्गिक असली तरी तिच्यावर धर्म आणि बाजारपेठ यांचा प्रचंड मोठा पगडा आहे, आता त्यात आणखीन एका घटकाची म्हणजेच सोशल मिडियाची भर पडली आहे. मुळात काय तर आपल्या लैंगिकतेवर सर्व प्रथम धर्मानं अधिराज्य गाजविलं, मग इथल्या बाजारपेठेनं आणि आता माध्यमक्रांतीच्या काळात माध्यमांच्या परिणामांपासून लैंगिकता कशी दूर राहू शकेल. त्यामुळं आपल्या पिढीनं लक्षात घेण्याची एक गोष्ट म्हणजे तुमची - माझी लैंगिकतेबाबतची जी काही खुळचट किंवा प्रगल्भ कल्पना आहे ती मुळात इथल्या माध्यमव्यवस्थेनं आणि आता जास्त 'स्पेसिफिक' बोलायचं ठरवलं तर सोशल मिडियानं पेरलेली आहे. भारतीय संदर्भात  विचार करायला सुरूवात करण्यापूर्वी जागतिक संदर्भात सोशल मिडिया आणि लैगिकता याचा विचार करूयात. आपल्याकडं सोशल मिडिया आता कुठं मागच्या १० वर्षाच्या काळात मुळं धरू लागला आहे. पण अमेरिकेसारख्या काही विशिष्ट अर्थानं विकसित देशात या सोशल मिडियाच्या झाडाला फळं लागायला सुरूवात झाली आहेत. त्यामुळं ती माणसं याकडं कसं पाहतात हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
                   ‘सिंड्रेला एट माय डॉटर’ या बहुचर्चित पुस्तकाच्या लेखिका पेग्गी ओरेनस्टेइन यांनी लिहिलेलं ‘गर्ल्स अँड सेक्स’ आणि नॅन्सी जो सेल्स यांचं ‘अमेरिकन गर्ल्स, सोशल मिडिया अँड द सिक्रेट लाईव्हज् ऑफ टिनएजर्स’ ही पुस्तकं मला अमेरिकन परिप्रेक्षात सोशल मिडिया आणि लैंगिकतेचा विचार करताना महत्त्वाची वाटतात.  या दोन्ही पुस्तकांचा सार म्हणजे, लैंगिकतेबद्दल निर्माण झालेला 'आयडेंटिटी क्रायसिस'. सोशल मिडिया हे वेगळंच विश्व आहे. या विश्वात तुम्ही कसे आहात यापेक्षा तुम्ही कसे असायला हवं यावर भर दिलेला दिसतो. तुमचं शरीर तुम्हांला कसं वाटतं यापेक्षा ते लोकांना कसं पाहायला आवडतं त्यानुसार बदल करण्याची सवय निर्माण होते आणि यातूनच स्वत:च्या लैंगिकतेबद्दलचा एक मोठा 'आयडेंटिटी क्रायसिस' निर्माण झाल्याचं समोर येतं. म्हणजे काय तर प्रत्येकाचं वैयक्तिक लैंगिक सौदर्यशास्त्र जन्माला येण्यापूर्वीच तुम्ही सोशल मिडियाच्या चौकटीनं तयार केलेल्या सौंदर्यशास्त्रामध्ये बंदिस्त होता आणि त्यानुसार स्वत..ला ‘अडजेस्ट’ करता.                       आता वापस आपल्या परिघामध्ये येऊ, ज्यात आज वावरणारी आपली पिढी ही सोशल मिडियाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या ‘अश्लिलतेनं’ ( अश्लिलता ही फक्त लैंगिक नसते याची कृपया नोंद घ्यावी) भरलेली, ‘प्रतिमाकेंद्रीत’ आणि ‘व्यावसायिक’ आहे व या पिढीसाठी सक्षमीकरण हा फक्त 'फिल' आहे. मुळात मला पुढं जायचं असेल तर फक्त माझं शरीर प्रदर्शित करून मी पुढं जाऊ शकते किंवा शकतो ही मानसिकता घेऊन जगणारी आमची पिढी. मी इथं स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही बोलतोय. 

                  मी काय लिखाण करतो किंवा मी कशाप्रकारचे विचार मांडतो, यापेक्षा मी कशा प्रकारच्या स्वप्रतिमा, फोटो सोशल मिडियावर टाकतो, त्याला किती ‘लाईक्स’ येतात, त्याची किती चर्चा होते, त्यावर किती ‘कॉमेंट्स’ येतात, यावर मी किती ‘विकसित’, ‘हुशार’ आणि ‘प्रगल्भ’ आहे याची चर्चा सुरू होते. हे तुम्हीही अनुभवू शकता. सोशल मिडियाचं ‘ऑडिट’ करून पाहिलं किंवा प्रयोग करून पाहिलं तर हे वास्तव समजायला वेळ लागणार नाही. मित्रमंडळींच्या चर्चांमध्ये सातत्यानं एक मुद्दा असतो, पोरींनी फोटो टाकला की लाईक्सचा पाऊस पडतो आणि पोरांनी फोटो टाकला की दुष्काळ. मग मुलगा किंवा मुलगी कोणीही एक विशिष्ट प्रकारचे हावभाव, एका विशिष्ट  प्रकारच्या समारंभातील (उदा. वाढदिवस या प्रकारातील)  फोटो टाकल्यास त्याला अधिक प्रतिसाद मिळतो. तर दुसऱ्या बाजूला सोशल मिडिया लैंगिकतेबाबतीचे नवीन नियम प्रस्थापित करू पाहत आहे. मी माध्यम क्षेत्रात काम करतो, त्यामुळं ही बाजू प्रकर्षाने तुमच्यासमोर मांडावी किंवा यावी अशी माझी इच्छा आहे. ‘नवीन नियम’ याचा अर्थ नवीन ‘मिथ्स’ किंवा ‘मिथकं’ प्रस्थापित करू पाहत आहे. माध्यमाच्या परिप्रेक्षातून अजून जास्त मर्यादित होऊन विचार करायचा झाल्यास खालील उदाहरणं महत्त्वपूर्ण ठरू शकतील. 

                आज देशातील कोणताही माध्यम समूह घ्या, मग तो प्रादेशिक असो वा राष्ट्रीय. तो वर्तमानपत्र असो वा वृत्तवाहिनी. प्रत्येकानं सोशल मिडियामध्ये आपले पाय रोवले आहेत. या सर्व माध्यमसंस्थांच्या फेसबुक पेज व इतर तत्सम सोशल मिडिया चनल्सचा अभ्यास केला असता असं जाणवतं की त्यातून वितरित होणारा सर्वाधिक मजकूर हा लैंगिकतेसंबंधीचा आहे. मग त्यात काय काय असतं, ‘आपल्या पतीला कसं आकर्षित कराल’, ‘आपल्या पत्नीला कसं आकर्षित कराल’, ‘संभोग करण्यापूर्वी काय काय कराल’, ‘या दहा गोष्टी तुमच्याकडं लैंगिक दृष्ट्या मुलींना, मुलांना आकर्षित करतील’, अशा मथळ्यांच्या बातम्या व फिचर्स मोठ्या संख्येने ‘व्हायरल’ होत फिरत असतात. अर्थात अशा बातम्या त्या माध्यमसंस्थेच्या वा माध्यसंकेतस्थळाचे  ‘हिट्स’ वाढविण्याचे काम करतात. पण यातून निर्माण होणारा धोका काय तर, आमची तरूण पिढी ‘माध्यमसाक्षर’ आणि आता ‘सोशल मिडिया साक्षर’ नसल्याने या ‘टिप्स’चे अंधानुकरण करण्याचा प्रयत्न करते. अशा टिप्सना कोणताही वैज्ञानिक आधार नसतो, मुळात ही फक्त आणि फक्त ‘लैंगिक मिथकं’ असतात. लैंगिकतेकडं संकुचित दृष्टीकोनातून पाहणाऱ्या समाजात वावरताना लैंगिक भावनांना वाट करून देण्याच्या प्रयत्नात झडगणाऱ्या तरूण – तरूणींना ही मिथकं ‘लैगिंक मुक्ती’चा मार्ग वाटू लागतात. त्यातूनच अशा मिथकांचं अंधानुकरण होतं व ते सोशल मिडियावरील ‘लैंगिकशास्त्र’ आहे, अशी आशा आमच्या पिढीला वाटायला सुरूवात होते. 
               2015 मध्ये मी एका ऑनलाईन चालणाऱ्या वृत्तसंस्थेमध्ये कामाला होतो. तिथं बातमीपेक्षा लैंगिक बातमीला अधिक महत्त्व असल्याचं सातत्यानं जाणवायला सुरूवात झाली होती. अशातच एका दिवशी त्या वृतसंस्थेच्या सोशल मिडियाच्या एका ‘आऊटलेट’वर एक बातमी येऊन पडली, आणि कोणत्याही विवेकी माणसासाठी ती बातमी वाचून डोक्यात स्फोट व्हावा परिस्थिती होती. बातमी होती, गर्भधारणा टाळायची असेल तर संभोग करण्यापूर्वी खालील उपाय वापरा. त्यातील उपाय होते, ‘स्त्रीच्या योनीमध्ये कांद्याचा रस पिळा, एरंडीच्या बिया खा वगैरे वगैरे’. मुळात हा सर्व प्रकार अशास्त्रीय आहे, अशा प्रकारांमुळे भारतात आजपर्यंत हजारो मृत्यू झालेले आहेत तरी अशा प्रकारची लैंगिक मिथकं तयार करणाऱ्या बातम्या प्रतिष्ठित वृत्तसंस्था पसरवित असतात, कारण सोशल मिडिया हे अशाच बातम्यांमधून त्यांना सर्वाधिक वाचक वर्ग मिळवून देण्याचं काम करत आहे.          
                  दुसरीकडं लैंगिकतेसंबंधीच्या समाजजीवनातील बाबी या आजच्या वृत्तसंस्थाच्या महत्त्वाच्या बातम्या ठरत आहेत. कोणत्या सेलिब्रिटीची अंतवस्र दिसली, लैंगिक शारिरीक भाग ‘एकस्पोज’ झाला अशा समांतर बातम्या आज मोठ्या प्रमाणात वृत्तसंस्थांच्या समाजमाध्यमामधून फिरताना दिसतात. म्हणजे सोशल मिडिया ही बाब जरी ‘आधुनिक’ असली तरी लैंगिकतेसंबंधीच्या किती खुळचट कल्पना घेऊन आपण यात वावरत असतो हे सातत्यानं अशा बातम्यांना मिळणाऱ्या ‘हिट्स’मधून आपल्याला जाणवतं.


लैगिक संवाद आणि स्पेस
                   आपण आज ज्या पारंपरिक मनोवृत्तीचे प्राबल्य असणाऱ्या समाजव्यवस्थेमध्ये राहत आहेत आणि जिथं ‘पब्लिक स्पेस’ नावाची गोष्टच आकुंचित होत चालली आहे, अशा ठिकाणी सोशल मिडिया लैंगिकतेसंबंधीची नवीन ‘डिजिटल स्पेस’ निर्माण करतोय. प्रियकर आणि प्रेयसी, मित्र आणि मैत्रिण निवांतपणे एखाद्या पब्लिक स्पेसमध्ये गप्पा मारू शकतील, अशी जागाच आज शिल्लक राहिली नाही. मी राहतो त्या पुणे शहारातील काही उद्यानांमध्ये तर अविवाहित स्त्री – पुरूष यांना एकत्र येण्यास, बसण्यास मज्जाव करण्यात आला आहे. काही वर्षापूर्वी प्रेमीयुगुलांना मारहाणही झाल्याच्या घटनाही ताज्या आहेत. प्रेमीयुगुल समजून भाऊ व बहिण यांना देखील त्रास सहन करावा लागल्याची चर्चा सगळ्यांच्या ‘सर्कल’मध्ये कधी ना कधी झालेलीच असेल.  त्यामुळं तारुण्यात अपेक्षित असलेली ‘स्पेस’ आजच्या पिढीला सोशल मिडियाच्या माध्यमातून मिळत आहे. त्यातून एक प्रकार नव्याने उदयास येतोय तो म्हणजे चॅटिंग स्वरूपात येणारा लैंगिक संवाद. डिजीटल संवादाच्या माध्यमातून प्रेमीयुगुल एकमेकांप्रती असलेले शारिरीक आकर्षण व शारिरीक संबंधाचा संवाद प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतात. मला वाटतंय ‘व्हॉट्सअप’ पिढीत तारूण्यात आलेला, आलेली कोणीही जी प्रेमात पडलेली आहे अशी व्यक्ती या गोष्टीला नाकारण्याचे धाडस करणार नाही. हे सर्व घडत असतं, मित्र  - मैत्रिणींमध्ये बोललं जातं पण लैंगिक चर्चा आणि सोशल मिडियाच्या परिप्रेक्षातून ही बाब पहिली जात नाही. आणि अर्थात सध्या तरी ती स्वागतार्ह आहे. बाकी सोशल मिडियाच्या माध्यमातून समाजाने दाबलेली लैंगिक चर्चा मोठ्या प्रमाणात खुली झाली हे नाकारण्याचे धाडस मी तरी करणार नाही. 
           तसं पाहिलं तर भारतात अजून सोशल मिडियाचा प्रभाव तुलनेने अधिक प्रमाणात जाणवत नाही. कदाचित आपण सोशस मिडिया वापरणाऱ्या समाजिक परिघामध्ये वावरत असल्याने ही चर्चा जास्त केली जात आहे. मुळात इंटरनेट माध्यमाचा वापर करणारी लोकसंख्या भारतात तुलनेने कमी आहे. पण सोशल मिडिया विस्तारत आहे हे मात्र नक्की, त्यामुळं आपण आज या विषयावर चर्चा करतोय ही खूप महत्त्वाची आणि समाधानकारक बाब वाटतेय. सोशल मिडिया हातात पडल्यानंतर आम्हां सर्वांना म्हणजे आमच्या पिढीला आपण सर्व आता आधुनिक झालेलो आहोत असं समजण्याचा रोग झाला आहे. पण तरी शेवट करताना एवढं सांगावसं वाटतंय, आपण अशा पिढीचे सदस्य आहोत जी, तांत्रिकदृष्ट्या ‘मॉडर्न’, सांस्कृतिक दृष्ट्या विशेषता लैंगिकतेच्या परिप्रेक्षातून ‘कॉन्झर्व्हेटिव्ह’ आणि विचाराने ‘रिअक्शनरी’ आहे.   

(सदर लेख मीडिया वॉच दिवाळी अंक २०१६ मध्ये प्रकाशित झाला आहे)


No comments:

Post a Comment