पुण्यात होऊ घातलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात केलेल्या विधानावरून वाद पेटला किंवा तो पेटविला गेला असंच म्हणणे संयुक्तिक ठरेल. या वादात सनातनचे वकील पुनाळेकर यांनी उडी घेतली आणि संमेलनाध्यक्षांना ‘मॉर्निंग वॉकला’ जाण्याचा सल्ला दिला. सनातन भोवतीचे सध्याचे चर्चेचे वलय लक्षात घेता त्या सल्याचे ‘धमकी’ म्हणून अर्थ काढले गेले. त्याला उत्तर म्हणून पुण्यातील पुरोगाम्यांनी सबनीसांना ‘मॉर्निग वॉकला’ही नेले. पिंपरीचे खासदार अमर साबळे यांनी संमेलन उधळण्याच्या धमक्या दिल्या आणि शेवटी आज श्रीपाल सबनीस यांनी जाहिर दिलगिरी व्यक्त केली.
हा सर्व वाद एका वेगळ्या परिप्रेक्षातून पहायला हवा होता असं मला वाटतं. या वादाने परत एकदा पुरोगाम्यांची भूमिका घेण्याबाबत असणारी गोंधळाची स्थिती समोर आणली. वादाचे मूळ काय होते ? याची सविस्तर मांडणी करण्यात माध्यमे नेहमी प्रमाणे अपुरी पडली किंवा त्यांनी तसा प्रयत्न केला नाही. वादाचा मूळ मुद्दा हा सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केलेला ‘एकेरी’ उल्लेख होता. त्यांनी मोदींवर काही राजकीय टिका केली आहे, असेही नव्हते. स्वत : सबनीस यांनी ‘मी मोदींचे कौतूक केले,’ असं वारंवार सांगितलं आहे. दिलगिरी व्यक्त करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेतही त्यांनी मोदींचे कौतुकच केल्याचे सांगितले. म्हणजे हा मुद्दा काही राजकीय नव्हता. तर हा पूर्णपणे भाषिक मुद्दा होता. त्याचे नंतर राजकारण करण्यात आले हे नाकारण्याचे काहीच कारण नाही.
सबनीस हे मुळचे मराठवाड्यातील लातूरचे, महाराष्ट्र – कर्नाटक सीमाभागातील संस्कृतीचा त्यांच्या प्रभाव दिसतो. या सीमा भागात मी अनेक वेळा गेलो आहे. मोठ्यांना अरे तुरे करणे हे या भागाचे ‘भाषिक वैशिष्ये,’ म्हणजे बापाला “काय बापा” असं बोललेले शब्दही या भागात फिरताना आपल्या कानी पडतात. सबनीस त्यांच्या बोलण्याच्या भरात मोंदीबद्दलही एकेरी बोलून गेले. नंतर सबनीस स्वत : म्हणाले “मी आपल्या बोली भाषेतून भावना व्यक्त केल्या.”
मला वाटतंय ‘बोली भाषा’ हा शब्द या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे. मराठी अशी भाषा आहे, जी प्रत्येक जिल्ह्यानुसार बदलते. म्हणजे सबनीस लातूरचे आहेत, म्हणून लातूरचंच उदाहरण देतो. लातूरच्या उत्तरेकडची म्हणजे रेणापूर, पळशीचा भाग यांची भाषा ही वेगळीच आहे. तर दक्षिणेकडे असणाऱ्या म्हणजे सीमा भागातील भाषा वेगळीच आहे. आपण त्याला त्या त्या भागाची बोली भाषा म्हणतो. माणूस ज्या भौगोलिक भागात वाढतो, त्या भाषेचा त्याच्या संपूर्ण जीवनात बोलण्या – लिहिण्यावर प्रभाव असतो. पण पुण्यातील अशीच काही ठराविक समुदायाची म्हणजे ३ टक्के लोकसंख्या बोलणाऱ्या लोकांची सामाजिक आणि प्रादेशिक मर्यादेत असणारी एक बोली भाषा आपण प्रमाण भाषा म्हणून स्विकारतो. मग सर्वांनी त्यांचे मूळ सोडून त्याच प्रमाण भाषेचा वापर करावा म्हणून काही जण आग्रही असतात. आणि हीच भाषिक असहिष्णूता या वादाच्या केंद्रस्थानी होती.
मग हा मुद्दा पूर्णपणे का बरं माध्यमातून चर्चिला गेला नाही. का एखाद्या भाषा तज्ञाला बोलवून ‘लिंग्विस्टिक’च्या दृष्टीने यावर चर्चा घडवून आणली गेली नाही ? की माध्यमांनांही फक्त राजकारणच घडवून आणायचं होतं ? कदाचित माध्यमांनी अशा चर्चा घडवून आणल्या असत्या तर हा वाद वाढलाही नसता. या चर्चांमधून मराठी भाषेची विविधता तरी समोर आली असती आणि मराठी भाषा बोलणारा मराठी माणूस अजून प्रगल्भ झाला असता. त्यातून आमची माध्यमंही विकसित झाली असती.
संमेलनाच्या स्वागतध्यक्षांनी एक टिपण्णी केली, ‘की हे ११ कोटी मराठी माणसांचं साहित्य संमेलन आहे. त्यामुळे ते नीट पार पाडणं गरजेचे आहे. त्यासाठी सबनीसांनी माघार घ्यावी.’ स्वागताध्यक्षांचा हा पूर्णपणे ढोंगीपणा होता. वर नमूद केल्याप्रमाणे सबनीस बोलले ती सीमा भागातील मराठी भाषाच होती. मग सबनीसांना माघार घ्यायला लावून तुम्ही त्या भागातील मराठी बोलणाऱ्यांचा आणि त्यांच्या भाषेचा अपमान तर करत नाहीत ना ? जर हा त्यांचा अपमान असेल तर हे साहित्य संमेलन ११ कोटी लोकांचे कसं काय असू शकतं ? म्हणजे हे साहित्य संमेलन फक्त प्रमाण भाषा बोलणाऱ्या महाराष्ट्रातील काय एक १० - १२ टक्के लोकांचंच म्हणावं लागेल. कारण महाराष्ट्रातील बाकीचे मराठी लोक ही प्रमाण भाषा बोलतच नाहीत.
दुसरीकडे पुरोगामीत्वाची पतका खांदावर वाहणाऱ्या भाई वैद्य यांनी सुद्धा एका वृत्तवाहिनीच्या चर्चेत सबनीस ‘जे बोलले ते चुकीचे होते, त्यांनी त्याची माफी मागायला हवी’ असं सांगितलं. भाई वैद्य यांच्याबद्दल आदर ठेवून मला काही प्रश्न उपस्थित करायचे आहेत. माझी अशी धारणा आहे की, पुरोगामी हे प्रत्येक अंगाची मग ती विचारांची, संस्कृतीची आणि अर्थात भाषेच्या विविधतेला समर्थन देतात. किंवा तिचा स्विकार करण्याचा, ती जोपासण्याचा त्यांचा आग्रह असतो. जर सबनीस हे अनेकदा सांगत असतील की ‘ती माझी बोली भाषा आहे’ तर भाईंनी त्यांना माफी मागायला सांगणं हे विचारांची आणि भाषेची विविधता मांडणाऱ्या पुरोगामीत्वात बसते का ? की पुरोगामीत्वाची चळवळ पण पुणेरीच झाली आहे का? भाई वैद्य यांनी ठणकावून का नाही सांगितले की ‘सबनीस जे बोलले ती पण मराठीच भाषा आहे. त्या सीमा भागातील भाषेचे ते वैशिष्ये आहे.’ ‘माफी मागायला हवी’ याचा अर्थ काय घ्यायचा ?
त्यामुळे आज दबाबापोटी सबनीसांनी व्यक्त केलेली दिलगिरी ही प्रमाण भाषेचा आग्रह धरणाऱ्यांनी मराठी भाषेच्या विविधतेचा केलेला पराभवच आहे. मराठी भाषेची विविधता आम्हांला अजून समजलीच नाही किंवा समजली असली तरी प्रमाण भाषा लादण्याचा आमचा हट्टयोग अजून संपलेला नाही.
आता या संदर्भात जे राजकारण झालं त्यावरही बोलणं गरजेचं आहे. एकीकडे मोदींच्या धार्मिक, राजकिय, अर्थिक, सामाजिक धोरणांना विरोध करणारे सबनीस यांची अभिव्यक्ती जपण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहिले. ही बाब स्वागतर्हाच आहे. पण सबनीसांनी मोदींचे केलेले कौतूक म्हणजे त्यांच्या धोरणांचे कौतूक होते. मग ही धोरणं सामाजिक, धार्मिक, राजकिय सर्वच बाबीतील असू शकतात.
मग एकीकडे धार्मिकतेला विरोध करायचा आणि त्याच धार्मिकतेला खतपाणी घालणाऱ्या विचारांचे समर्थन करणाऱ्यांचेही समर्थन करायचे. ही बाब सध्याच्या परिस्थितीमध्ये अतिशय घातक असल्याचे माझे मत आहे. आणि सबनीस यांच्या अभिव्यक्तीवर कोणत्या प्रकारे गदा आली हे काही मला अजून कळालेले नाही. त्यांनी नरेंद्र मोदी यांचे करायचे तेवढे कौतूक केले आहेच की. त्यामुळे या वादामुळे परत एकदा पुरोगामीत्वाची धुरा सांभाळणाऱ्या मंडळींचीं गोंधळाची परिस्थिती समोर आली.
शेवटी विरोधाची धुरा सांभाळणारे आणि ज्यांनी धमक्यांचा महापूर आणि निषेधाचे सोहळे भरवले त्यांच्याबद्दल. रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले व भारतीय जनता पक्षाचे खासदार अमर साबळे यांनी श्रीपाल सबनीस यांनी माफी मागितली नाही तर संमेलन उधळून टाकण्याच्या धमक्या दिल्या. कदाचित या दोन्ही नेत्यांना माहिती नसेल की, प्रमाण भाषेच्या आग्रहावरून फक्त ग्रामीण माणसालाच नाहीतर इथल्या दलित आदिवासींना अनेक ठिकाणी नाकारण्यात आले आहे. त्यांची संस्कृती नाकारली गेली. त्याच दलित समाजाचे नेतृत्व करीत असल्याचा आव खासदार अमर साबळे आहे आणि रामदास आठवले यांनी आणला आहे. अमर साबळे यांना खासदारकी मिळाली त्याचे आभार ते पक्षाकडे अशा प्रकारे व्यक्त करत आहेत. तर रामदास आठवले यांनी फक्त आता खाकी चड्डी घालायची बाकी आहे.
शेवटी हा सर्व वाद भाषिक परिप्रेक्षातून पाहिला गेला असता, चर्चिला गेला असता तर तो कदाचित एवढा वाढलाही नसता. सबनीस यांनी आज मागितलेली दिलगिरी ही राज्यातील अनेक वेगवेळ्या धाटणीची मराठी बोलणाऱ्या महाराष्ट्रातील माणसांचा अपमान होता. मराठी भाषेच्या विविधतेचा तो पराभव होता. पुण्याबाहेर बोलल्या जाणाऱ्या भाषेचं स्थान काय ? हा प्रश्न आज परत एकदा निर्माण झालाय. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे संमेलन नक्की कोणाचं आहे ? याचं उत्तरही मिळालं आहे.
टीप - माझं सबनीस यांना फक्त भाषिक विविधतेच्या दृष्टीकोनातून समर्थन आहे. सबनीस यांना काही एक ठोस राजकीय किंवा सामाजिक भूमिका आहे अशी माझी बिलकूल अंधश्रद्धा नाही.
लेखकाचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा
http://movementswatch.blogspot.in/
http://bhosaleabhi.blogspot.in/
http://bhosaleabhi.blogspot.in/